‘काँग्रेसचा विचार तरूणांमध्ये अधिक प्रखरतेने पेरला पाहिजे’ – माजी खासदार अशोक मोहोळ

पुणेः- दि ३ – ‘काँग्रेस पक्षाला विचारांची, त्यागाची, बलिदानाची आणि योगदानाची’ दीर्घ परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने काँग्रेसने देशाचा प्रवास घडविला आहे. काँग्रेसचे हे योगदान आणि ही राष्ट्रहिताची दृष्टी आजच्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये पेरली पाहिजे, रूजवली पाहिजे असे मत माजी खासदार अशोक मोहोळ यांनी व्यक्त केले.

राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य, पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अर्बन बँकेचे संचालक सूर्यकांत उर्फ बाळासाहेब मारणे यांच्या एक्काहत्तरी निमित्त काँग्रेसचा विचार जगलेले आणि आयुष्यभर काँग्रेस पक्ष्याशी निष्ठा राखलेल्या पाच ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा सत्कार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई
यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अशोक मोहोळ बोलत होते.

‘राजीव गांधी स्मारक समिती’ आणि ‘गोपाळदादा तिवारी मित्र परिवारातर्फे’ लकडी पूल विठ्ठल मंदिरातील संत तुकाराम महाराज सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मधुकर सणस, भगवान धुमाळ, रामचंद्र उर्फ भाऊ शेडगे, शेखर बर्वे आणि बुवा नलावडे या पाच ‘ज्येष्ठ काँग्रेसजनांचा’ सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहन जोशी व रमेश बागवे यांचा ही ‘विशेष सत्कार’ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, उल्हास पवार आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप इ मान्यवर उपस्थित होते.
लोकशाही रूपी ‘स्वतंत्र भारताची’ निर्मितीत काँग्रेसचेच योगदान आहे त्यामुळे देशात काँग्रेसजनांचे महत्व अनन्य साधारण आहे.. त्यामुळे ‘काँग्रेस विचारांची साथ’ म्हणजे ‘राष्ट्रीय विचारांची साथ’ या भावनेने ‘काँग्रेस विचारांची आयूष्यभर निष्ठा जोपासलेल्या जेष्ठ काँग्रेस जनांचा’ सत्कार करण्याचे ठरवल्याचे संयोजक राजीव गांधी समितीचे अध्यक्ष व काँग्रेस चे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी स्वागत – प्रास्ताविकपर भाषणात सांगितले..!

यावेळी बोलतांना अशोक मोहोळ म्हणाले की, मनाचा मोठेपणा दाखवित कार्यकर्त्यांसमोर काँग्रेसमधील ज्येष्ठांनी वस्तूपाठ निर्माण करून ठेवले पाहिजेत. कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि धडाडी का कमी होत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. कार्यकर्त्यांमध्ये चेतना प्रज्वलित करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे. नक्की चुका कुठे होत आहेत, त्या चुका शोधून त्यावर काम केल्याशिवाय उभारी येणार नाही. काँग्रेस हा केवळ एक राष्ट्रीय पक्ष नसून तो राष्टहिताचा एक विचार आहे. लोकांपर्यंत जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेण्याच्या स्तरावर काम झाले पाहिजे. काँग्रेसचा मूळ विचार कुठेतरी लुप्त होत आहे, अशी शंका येते. तंत्रज्ञानामुळे देश आणि विचार प्रचंड झपाट्याने बदलत आहेत. त्या बदलणाऱ्या जगाला आणि विचारांना सामोरे जाणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली पाहिजे. गेल्या 70 वर्षात काय केले या भूतकाळात रमण्याऐवजी आगामी 70 वर्षात आपण काय करणार आहोत, याचा आलेख मांडला पाहिजे.
यावेळी बोलतांना हेमंत देसाई म्हणाले की, महात्मा गांधींनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ अशी उपमा दिली होती. ती उपमा अतिशय योग्य होती. परंतु, आता अलीकडे सर्वच पक्षांतील निष्ठा खूप पातळ होत चालली आहे. “पक्षा-पक्षांमध्ये होणारी आश्चर्यकारक आणि धक्कादायक आवक-जावक” पाहिल्यावर निव्वळ सत्तालोलूप राजकारणाचे हे अधोरेखित आहे. लोकांना भेडसावणारे प्रश्न हाती घेऊन काँग्रेसने काम करणे अपेक्षित आहे. केवळ स्मरणरंजनात न रमता आजच्या पिढीचे प्रश्न आणि महत्वाकांक्षा लक्षात घेतल्या पाहिजे. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि एकूणच गांधी घराण्याचे भारत घडविण्यामधील योगदान नवीन कार्यकर्त्यांसमोर मांडले पाहिजे. राजीवजी गांधी यांचे नेर्तृच्व अधोरेखित करतांना त्यांनी केवळ इलेक्ट्रॉनिक आणि संगणकीय क्रांती घडवली एवढ्यापुरतेच मर्यादित न ठेवता भारत-चीन संबंध दृढ होण्यात राजीव गांधी यांनी दिलेले योगदान, जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजीव गांधी यांनी केलेले प्रयत्न आणि एकूणच त्यांचे परराष्ट्रीय धोरण देखील लक्षात घेतले पाहिजे. देशापुढे आज एवढे कठीण प्रश्न असतांना काँग्रेसमध्ये आलेली उदासीनता आणि मरगळ झटकून काम केले पाहिजे. देश पातळीवर सक्षमपणे काम करणा-या नेर्तृत्वांची यादी करून त्या नेर्तृत्वाकडे भाजपला पर्यायी व्यवस्था देण्याच्या कार्याची जबाबदारी दिली पाहिजे. बेकारी, वाढते पेट्रोल व गॅसचे दर, जीएसटी, लघू उद्योगांचे प्रश्न अशा अनंत समस्या घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरू शकते. त्यासाठी काँग्रेसने भूतकाळातून बाहेर येऊन काम केले पाहिजे. केवळ नरेंद्र मोदी किंवा भाजपला निशाणा करण्याऐवजी पर्यायी सकारात्मक विचार मांडला पाहिजे.

यावेळी बोलतांना उल्हास पवार म्हणाले की, प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव हे वास्तव असले तरी काँग्रेसने आपली राष्ट्रीय ओळख जपत शक्तीहीन झालेल्या कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे. आमच्या काळात आम्ही प्रचंड संघर्ष करीत काँग्रेसमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण केले होते. मा राहूलजी गांधी चांगले व काम करत असून, त्यांना सत्य वस्तुस्थिती अवगत केली गेली पाहीजे.. या मध्ये खरेतर पक्षाध्यक्षांनी नेमलेले “राज्य प्रभारींवर” मोठी जबाबदारी असते.. चांगले प्रभारी राज्यातील पक्ष संघटना वाढवू शकतात तर त्यांच्या आचरण व वागण्याने राज्यातील पक्षाची वासलात ही लागू शकते, याचे प्रत्यक्ष अनुभव आहेत.

सत्कारार्थींमध्ये सुर्यकांत उर्फ बाळासाहेब मारणे, शेखर बर्वे आणि भगवान धुमाळ यांनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. तसेच मोहन जोशी आणि बाळासाहेब शिवरकर यांची ही भाषणे झाली.
राजीव गांधी समितीच्या वतीने सदस्य व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, तसेच भोला वांजळे, महेश अंबिके, धनंजय भिलारे, संजय अभंग, नितीन पायगुडे, अशोक काळे, शंकर शिर्के, सुरेश ऊकीरंडे इ नी पाहूण्यांचे सत्कार केले. गणेश कुरे, बाळूशेठ ओझा, समीर धाडगे, ॲड फैयाज शेख, संजय मोरे, गणेश मारणे, राजू नाणेकर, कुणाल काळे, विजय शिर्के इ नी संयोजनात सहकार्य केले.. ‘आभार प्रदर्शन’ समिती सदस्य व (पीएमपीएमएल) इंटक कामगार नेते श्री राजेंद्र खराडे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: