वडापावचे पैसे न दिल्याने गजा मारणेवर गुन्हा दाखल

पुणे – कुख्यात गुंड गजा मारणेवर आणि त्याच्या टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रॅली काढत असताना उर्से टोल नाक्याजवळील फूड मॉलवर थांबून त्याने पैसे न देता पाणी व वडापाव घेतले. दुकानदाराला पैसे न दिल्यामुळे गजा मारणे आणि त्याच्या टोळीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. तुरुंगाबाहेर पडल्यानंतर काढलेली जंगी मिरवणूक असो किंवा पोलिसांच्या नाकावर टिच्चून मिळवलेला जामीन, या सर्व घटनांमुळे गजा मारणे हा पोलीस प्रशासनासाठी एक आव्हान ठरत आहे.

गजा मारणेविरोधात चार्जशीट दाखल होताच मोक्का दाखल करणार अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. एका गुन्ह्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गजानन मारणेला फरार घोषित केलं होतं. मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून गजा मारणे मावळ कोर्टात हजर झाला आणि त्याला न्यायालयाकडून जामीनही मंजूर झाला होता.

दरम्यान, पोलिसांना न सापडणारा गजा मारणे जामीन घेऊन न्यायालयातून बाहेर पडल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस गजानन मारणे याच्यासह त्याच्या टोळीवर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: