कलावंत रसिकांच्या टाळ्यांचा भुकेला – जयमाला इनामदार

पुणे : कलावंतांना रसिक हवे असतात, रसिकांच्या टाळ्या हव्या असतात. सध्याच्या परिस्थितीमुळे घरी बसावे लागलेल्या कलावंताची अवस्था जेलमधील कैद्यासारखी झाली आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी व्यक्त केल्या.

भरत नाट्य संशोधन मंदिर निर्मित आणि संजय डोळे लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा सौजन्य’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवारी (दि. 28 फेब्रुवारी) भरत नाट्य मंदिरात झाला. या प्रयोगाला ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकात ‘पारूबाई’ ही भूमिका साकारलेल्या इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्यप्रयोगादरम्यान त्यांनी रसिकांशी संवाद साधला. नाटकाचे संगीतकार प्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी उपस्थित होते.

आठवणींना उजाळा देताना इनामदार म्हणाल्या, ‘पुन्हा सौजन्य’ हे नाटक बघताना ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकाच्या आठवणी जाग्या झाल्या. ते नाटक करीत असताना राजा गोसावी यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. प्रकाश इनामदार हे पती असले तरी नाट्यक्षेत्रातील ते माझे पहिले गुरू आहेत. मूळ कलाकृतीला धक्का न लावता ‘पुन्हा सौजन्य’ साकारणार्‍या कलाकारांचे त्यांनी कौतुक केले. कोरोनाकाळात रसिकांनी भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा इनामदार यांनी व्यक्त केली.

सुरुवातीस चंद्रशेखर महामुनी यांचा सत्कार गायक-अभिनेता संजीव मेहेंदळे यांनी केला. जयमाला शिलेदार यांचा सत्कार संजय डोळे आणि पूजा गिरी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत नाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी केले.

या नाट्यकलाकृतीविषयी बोलताना संजय डोळे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळातच हे नवेकोरे नाटक लिहिले आहे. या नाटकात सासू-सुना, नवरा-बायको यांच्यातील कौटुंबिक कलह नाहीत तर एकमेकांशी अजिबात न पटणार्‍या भांडकुदळ रहिवाशांच्या सोसायटीत घडणारे हे धमाकेदार नाट्य आहे. सोसायटीतील सभासद एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात घडणार्‍या विनोदी प्रसंगांची मालिका रसिकांना नक्कीच खळखळून हसवेल यात शंका नाही. कुठल्याही समस्या, हेवेदावे, उपदेशांचे डोस न पाजणारे; निखळ मनोरंजन घडविणारे हे नाटक प्रेक्षकांसमोर आणले आहे.

या नाटकात संजय डोळे यांच्यासह पूजा गिरी, रोमा गिरी, विश्वास पांगारकर, वंदन गरगटे, प्रदिप कुलकर्णी, अक्षय आठवले, विशाल बावणे, इरा जोशी यांच्या भूमिका आहेत. सुप्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी यांनी नाटकाला संगीत दिले आहे तर नेपथ्य विश्वास पांगारकर यांचे आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: