औंध जिल्हा रुग्णालयात दारूच्या बाटल्यांचा खच

संबंधितांवर कारवाईची सी.आर. सामाजिक संघटनेची मागणी


पिंपरी, दि. २८ –  नवी सांगवी येथील औंध जिल्हा सामान्य रूग्णालय कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. विशेष म्हणजे रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्याची मागणी सी.आर. सामाजिक संघटनेचे पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख शशिकांत निकाळजे यांनी केली आहे.

औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगले उपचार मिळत असल्याने रुग्णांची मोठी गर्दी असते. रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आल्याने, तसेच सोयीसुविधा वाढविण्यात आल्या आहेत. पण अलीकडे रुग्णालय परिसरात अस्वच्छता दिसत असून, अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. रुग्णालय परिसरात दारूच्या बाटल्या नेमक्या आल्या कुठून, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. आता ह्या बाटल्यातील दारू नक्की पेशेंटचे नातेवाईक पितात की अन्य कुणी, या विषयी शंका आहे. दारू पिऊन कोणी रुग्णालयात काम करत असेल, तर रुग्णाचे हाल झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे एखाद्या रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते.       रुग्णालयात साफसफाई व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून, सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले, की याविषयी लक्ष देऊन काळजी घेऊ. रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याला प्राधान्य असून, अस्वच्छता करणाऱ्यांवर कठोर  कारवाई करण्यात येईल.         

दारूच्या बाटल्या नेमक्या कुठून आल्या, रुग्णालय परिसरात दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेच्या वतीने शशिकांत निकाळजे यांनी दिला आहे. यावेळी प्रशांत कडलक, शाम मोहिते, आशिष घोरपडे, देवेश चव्हाण, विनीत निकाळजे व संघटनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: