fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

व्यवसायावरून व्यक्तीकडे बघण्याची मानसिकता बदला-माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांचे मत

पुणे : परदेशात एखाद्या व्यवसायावरून कोणाला उच्च किंवा कमी समजले जात नाही. तिथे सगळे व्यवसाय सारखेच असतात. एखाद्या अधिकाºयाचा मुलगा आणि छोट्या व्यवसायिकाचा मुलगा हे एकाच वर्गात शिकतात. परंतु आपल्याकडे असे चित्र दिसत नाही. आपल्याकडे व्यवसायावरून व्यक्तीकडे पाहिले जाते आणि त्याला तशी वागणूक दिली जाते. व्यवसायावरून व्यक्तीकडे बघण्याची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले. 

लॉन्ड्री व्यावसायिक संघातर्फे लॉन्ड्री व्यावसायिकांना भविष्यात प्रगती करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरीता टिळक स्मारक मंदिरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अभय माटे, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, संत गाडगेमहाराज लॉन्ड्री संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष सुनील दळवी, लॉन्ड्री संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष चेतन शिंदे, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पुणे वितरणचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक राजेंद्र म्हंकाळे, लॉन्ड्री व्यावसायिक संघाचे अध्यक्ष प्रकाश अभ्यंकर, महासचिव अमित जाधव, खजिनदार राहुल राक्षे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमात लॉन्ड्री व्यवसायिकांसाठी स्मार्ट कार्ड – ओळखपत्र योजना आणि नवीन दरपत्रकाचे अनावरण करण्यात आले. उपाध्यक्ष गणेश चव्हाण, अरुण भालेकर, शाम जगताप, सहसचिव नारायण पवार, सहखजिनदार रामभाऊ राऊत यांचे मेळाव्याला सहकार्य लाभले. 
भानुप्रताप बर्गे म्हणाले, संघटना जेव्हा एकत्र काम करते तेव्हा त्यांनी पुढील पिढीचा देखील विचार केला पाहिजे. समाजातील यशस्वी आणि मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविले पाहिजेत. तरच मुलांसमोर चांगले आदर्श निर्माण होतील. तरुणांनी देखील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन कल्पना राबवून व्यवसाय वाढीचा विचार केला पाहिजे.

अभय माटे म्हणाले, पिढ्यांपिढ्याचा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय वाढीसाठी तरुणांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर नक्कीच प्रगती होईल. त्याचबरोबर महिलांनी देखील त्यास अनुसरून जोड व्यवसाय सुरू केला पाहिजे. राजेंद्र म्हंकाळे म्हणाले, व्यावसायिकांनी स्वत:च्या प्रगतीसाठी संघटीत होणे गरजेचे आहे. संघटीत होवून काम केले तर स्वत:बरोबर समाजाची देखील प्रगती होईल. स्वत:चा व्यावसाय करीत असताना टेक्निकल गोष्टींचा विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले. 
लॉन्ड्री व्यावसायिक संघटनेतर्फे स्मार्ट कार्ड योजना बंधनकारक करण्याचे योजिले आहे.व्यावसायिकांनी सभासद होऊन स्मार्ट कार्ड घेणे बंधनकारक होणार आहे. पोलिसांचे याबद्दल मार्गदर्शन आणि  सल्ला घेऊन सोसायट्यांच्या मिटिंग घेऊन स्मार्ट कार्ड असलेल्या लॉन्ड्री व्यवसायिकालाच सोसायट्यांमध्ये घरांमध्ये होम डिलिव्हरी ला परवानगी देण्याबाबत विचार करुन संघटना वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.शिवाय सोसायट्यांचे ही सिक्युरिटी व्यवस्थित राहणार आहे व लॉन्ड्री व्यावसायिकांनाही आणि पोलिसांनाही एकमेकांना सहयोग होणार आहे, असे संघातर्फे सांगण्यात आले. अशोक शेलार यांनी सूत्रसंचालन केले, अमित जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश अभ्यंकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading