तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना मराठीला प्राधान्य द्यावे -आमदार मुक्ता टिळक

पुणे : पुणे मनपा ही एकमेव महापालिका आहे, ज्या पालिकेने मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन केली आहे. त्यामुळे पालिकेच्या अंदाजपत्रकात समितीसाठी जास्तीचा निधी द्यावा. तुळशीबागेत मराठी व्यावसायिकांप्रमाणे अन्य भाषिक देखील आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही, ही खंत प्रत्येक मराठी माणसाला असायला हवी. तसेच तुळशीबागेतील व्यापा-यांनी व्यवहार करताना मराठीला प्राधान्य द्यायला हवे, असे मत महाराष्ट्र राज्य मराठी भाषा संवर्धन समितीच्या सदस्या आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. 

तुळशीबाग व्यापारी असोसिएशनतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त तुळशीबागेतील पाच मराठी व्यावसायिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन कावरे कोल्ड्रिंक्सच्या समोर करण्यात आले होते. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पंडित, कार्याध्यक्ष मोहन साखरीया, उपाध्यक्ष किरण चौहान, दुर्गेश नवले, सरचिटणीस संजीव फडतरे, सहचिटणीस जितेंद्र अंबासनकर, सहखजिनदार किरण भंडारी, चेतन कावरे, जिगर शहा, कुशल पारेख, संदेश जव्हेरी, अक्षय पुजारे, राजेंद्र साखरीया, राजेश शिंदे आदी उपस्थित होते. 

कावरे कोल्ड्रिंक्सचे बाजीराव कावरे व सुनील कावरे, कुलकर्णी स्टोअर्सच्या मधुरा कुलकर्णी, सखी चे गणेश रामलिंग व निलेश रामलिंग, अनुराग जनरल स्टोअर्सचे धनंजय कर्वे, के.प्रभाकर स्टोअर्सचे राजीव काळे यांना सन्मानित करण्यात आले. शाल, फळांची परडी, मोत्याची माळ, सनमानपत्र व पुणेरी पगडी असे सन्मानाचे स्वरुप होते. 
सूर्यकांत पाठक म्हणाले, तुळशीबागेचे नाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर आज जागतिक स्तरावर पोहोचले आहे. तुळशीबागेत मोठया प्रमाणात मराठी व्यावसायिक आहेत. अनेक क्षेत्रात मराठी माणूस हा पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, ज्याठिकाणी आपण मागे आहोत, त्या क्षेत्रात मराठी माणसानेच मराठी माणसाला मोठे करायला हवे. 
हेमंत रासने म्हणाले, मराठी भाषेविषयी अभिमान बाळगत असतानाच, अनोळखी व्यक्तीशी बोलताना देखील आपण मराठीमध्ये बोलायला हवे. अनेकदा आपण हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात करतो. तसे न करता आपल्या भाषेचा अभिमान बाळगत प्रत्येकाशी मातृभाषेत बोलायला हवे, असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: