पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे मीराताई देशपांडे उत्कृष्ट महिला संचालिका पुरस्कार प्रदान
-स्मिता यादव, सुजाता पारखी, नंदा काळभोर, विजया शिंदे मानकरी
पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे मीराताई देशपांडे उत्कृष्ट महिला संचालिका पुरस्कार वितरण सोहळा अरणेश्वर येथील असोसिएशनच्या शिवाजीभाई ढमढेरे सभागृहात पार पडला. सन २०१९-२० चे पुरस्कार स्मिता यादव (पुणे शहर), सुजाता पारखी (पुणे जिल्हा) आणि सन २०२०-२१ चे पुरस्कार नंदा काळभोर (पुणे शहर), विजया शिंदे (पुणे जिल्हा) यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड. साहेबराव टकले, मानद सचिव संगीता कांकरीया, मिलींद आळे, माधव माटे, जनार्दन रणदिवे, किरण मांजरे, सुहास पांगुळ, डी.एस.तावरे, अनिल तुपे, असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे यांसह अन्य बँकांचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
सन २०१९-२० च्या पुरस्कार विजेत्या स्मिता यादव या जिजामाता महिला सहकारी बँक आणि सुजाता पारखी या प्रेरण को-आॅप बँक लि. थेरगाव येथे कार्यरत आहेत. तसेच, सन २०२०-२१ च्या पुरस्कार विजेत्या नंदा काळभोर या साधना सहकारी बॅक लि. आणि विजया शिंदे या राजगुरुनगर सहकारी बँक लि. येथे कार्यरत आहेत. रुपये २१ हजार रोख, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, मीरा देशपांडे या भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुमारे ४० वर्षे संचालिका होत्या. बँकेच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य होते. त्यांच्या स्मृती जागृत रहाव्या, याकरीता त्यांचे चिरंजीव सिटी कॉर्पोरेशन लि. चे कार्यकारी संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला आहे. या पुरस्कारामुळे सहकारी बँकांमध्ये काम करणा-या महिला संचालिकांमध्ये चांगले व भरीव काम करण्याची निकोप स्पर्धा होऊन त्यांचा बँकेतील कामकाजात सक्रिय सहभाग वाढेल. त्याचा फायदा सहकारी बँकांना निश्चितपणे होईल.
