‘पुन्हा सौजन्य’ म्हणत निखळ मनोरंजनाची ‘भरत’ची नवनिर्मिती

सोसायटीतला भांडणतंटा आहे पण ताणतणाव नाही, हेवेदावे नाहीत तर ‘पुन्हा सौजन्य’ म्हणत हास्यखोर निखळ मनोरंजन असलेले भरत नाट्य मंदिर निर्मित नवे कोरे नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे.

गेले वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ताणतणावातच गेले, अजूनही परिस्थिती निवळलेली नाही; निर्बंध कायम आहेत, उद्या काय होणार याची कुणालाच शाश्वती नाही. अशा परिस्थितीत डोक्याला शॉट न लावता, तणावात भर न घालता हवे आहेत मनाला-जीवाला रिलॅक्स करणारे काही क्षण! आणि हे हलके-फुलके, हसरे क्षण घेऊन आले आहेत पुण्यातील प्रतिथयश रसिकमान्य कलावंत ‘पुन्हा सौजन्य’ या नाटकाच्या माध्यमातून.

संजय डोळे लिखित-दिग्दर्शित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी भरत नाट्य मंदिरात होत आहे. दुपारी 1 आणि सायंकाळी 5 वाजता असे दोन प्रयोग होणार आहेत. तिसरा प्रयोग दि. 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

या नाट्यकलाकृतीविषयी बोलताना डोळे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळातच हे नवेकोरे नाटक लिहिले आहे. लॉकडाऊनंतर येणारे हे ‘भरत’चे पहिले नवे नाटक आहे. सासू-सुना, नवरा-बायको यांच्यातील कौटुंबिक कलह नाहीत तर एकमेकांशी अजिबात न पटणार्‍या भांडकुदळ रहिवाशांच्या सोसायटीत घडणारे हे धमाकेदार नाट्य आहे. सोसायटीतील सभासद एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात घडणार्‍या विनोदी प्रसंगांची मालिका रसिकांना नक्कीच खळखळून हसवेल यात शंका नाही. कुठल्याही समस्या, हेवेदावे, उपदेशांचे डोस न पाजणारे; निखळ मनोरंजन घडविणारे हे नाटक प्रेक्षकांसमोर आणण्याची उत्सुकता आहे.

या नाटकात संजय डोळे यांच्यासह पूजा गिरी, रोमा गिरी, विश्वास पांगारकर, वंदन गरगटे, प्रदिप कुलकर्णी, अक्षय आठवले, विशाल बावणे, इरा जोशी यांच्या भूमिका आहेत. सुप्रसिद्ध गायक चंद्रशेखर महामुनी यांनी नाटकाला संगीत दिले आहे तर नेपथ्य विश्वास पांगारकर यांचे आहे.

-=-

Leave a Reply

%d bloggers like this: