तेलगू कवी वरवरा राव यांना जामीन मंजूर

मुंबई, दि. 22 – भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले तेलुगु कवी वरवरा राव यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात तेलगू कवी वरवरा राव यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून 50 हजाराच्या जात मुचलक्यावर सहा महिन्यांसाठी त्यांची सुटका करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी वरवरा राव यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. 82 वर्षीय वरवरा राव यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

भीमा-कोरेगाव हिंसाचार एल्गार परिषदप्रकरणी वरवरा राव यांना अटक करण्यात आली असून त्यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. राव यांना कोविड होऊन गेला असून त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राव यांचे वय पाहता तसेच आजारपणाच्या मुद्द्यावर पत्नी हेमलता राव यांनी ज्येष्ठ काऊन्सिल आनंद ग्रोव्हर आणि अॅड. ए. आर. सत्यनारायणन यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी युक्तिवाद पूर्ण झाला असून एनआयएने वरवरा राव यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. याप्रकरणी राखून ठेवलेला निकाल न्यायमूर्ती एस. एस. शिंदे सोमवारी सकाळी 11 वाजता जाहीर केला.

Leave a Reply

%d bloggers like this: