जितेंद्र जोशी यांना’सीएसआर शायनिंग स्टार पुरस्कार’

पुणे, दि. २१ – पुण्यातील अभि ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र जोशी यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘सीएसआर शायनिंग स्टार पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. वोकहार्ड फाउंडेशनच्या वतीने डॉ. जितेंद्र जोशी यांनी अभि ग्रुप व अभि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत या पुरस्काराने गौरविण्यात आले. वोकहार्ड फाउंडेशनचे विश्वस्त हुजैफा खोराकीवाला, भारतीय विकास संस्थानचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण व अन्य क्षेत्रात सामाजिक दायित्व भावनेतून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या औद्योगिक, सामाजिक संस्था व व्यक्तींना ‘सीएसआर शायनिंग स्टार पुरस्कार’, तर प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक रतन टाटा यांना फाउंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदुस्थान युनिलिव्हर, अशोक लिलॅन्ड, ओएनजीसी, कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, एस्सार, आयटीसी, लार्सन अँड टर्बो अशा बड्या कॉर्पोरेट कंपन्यांचा ‘सीएसआर’मधील कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

डॉ. जितेंद्र जोशी यांनी अभि ग्रुपच्या माध्यमातून कोरोनाच्या कठीण काळात देशभर वैद्यकीय उपकरणे, साहित्य पोहोचवले. अभि चॅरिटेबल ट्रस्टद्वारे पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, गरजुंना अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक गोष्टींची मदत करण्यात आली. जागतिक स्तरावरील कॉर्पोरेट कंपन्यांच्या समवेत राज्यपालांच्या हस्ते सन्मान मिळाल्याबद्दल डॉ. जितेंद्र जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: