महिला सुदृढ व सशक्त असतील तरच देशाची उन्नती- सामाजिक कार्यकर्ते राम बांगड

पुणे :  कोणताही देश किंवा समाज तेव्हाच उन्नती करु शकतो, ज्यावेळी त्या देशातील महिला सुदृढ व सशक्त असतील. त्याकरीता महिलांनी स्वत:चे आरोग्य चांगले रहावे, याकरीता प्रयत्न करायला हवेच. परंतु त्यासोबतच कुटुंबातील पुरुषांनी देखील महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम बांगड यांनी व्यक्त केले. 

जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन आणि रक्ताचे नाते ट्रस्ट, महाराष्ट्र तर्फे रक्तदान शिबीर, महिलांसाठी मोफत स्तन आरोग्य पूर्वतपासणी आणि आजार निदानाकरीता कार्ड वितरण कार्यक्रम शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन येथे घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पुणे शहराध्यक्ष स्वाती पोकळे, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, आयोजक फाऊंडेशनच्या अध्यक्षा अ‍ॅड.ॠÞचा जेधे, कान्होजी जेधे तसेच संपूर्ण जेधे परिवार उपस्थित होते.

दिवसभरात खासदार गिरीष बापट, माजी आमदार मोहन जोशी, रोहित टिळक आदींनी शिबीरस्थळी भेट दिली. लायन्स राहतेकर कॅन्सर सेंटर व हरबायु वेलनेस इंडिया प्रा. लि. यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य मिळाले. 
राम बांगड म्हणाले, देशासह महाराष्ट्रात देखील वयवर्षे ४० च्या वरील महिला वर्गात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. जर त्याचे पूर्वनिदान केले गेले, तर वेळ, पैसा, मनस्ताप वाचेल. तसेच इलाज वेळेवर करुन त्यातील मृत्युचे प्रमाण कमी  होईल. याकरीता येत्या वर्षभरात १० हजार महिलांचे पूर्वनिदान करण्याचे रक्ताचे नाते ट्रस्टने योजिले आहे. रक्तदानासोबत ही मोहिम देखील मोठया प्रमाणात राबविली जाईल. 
स्वाती पोकळे म्हणाल्या, महिलांकरीता ठिकठिकाणी आरोग्यविषयक उपक्रम होणे गरजेचे आहे. महिला या संपूर्ण कुटुंबाचा कणा असते, त्यामुळे त्यांनी स्वत:च्या आरोग्याकडे देखील लक्ष द्यायला हवे. शहराच्या पूर्व भागात अशा प्रकारचे उपक्रम आणखी मोठया स्वरुपात होणे गरजेचे आहे. 

अ‍ॅड.ॠचा जेधे म्हणाल्या, महिलांसाठी स्तन आरोग्य पूर्वतपासणी करणे आवाश्यक आहे. वेळेत निदान झाल्यास पुढील उपचार करुन महिलांचे आरोग्य नीट राखण्यास मदत होऊ शकेल. नोकरी, घर आणि कुटुंब याकडे महिला जास्त लक्ष देत असल्याने स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आम्ही शिबीराचे आयोजन व गरजेनुसार महिलांना उपचार देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: