उस्ताद शुजात खान आणि रणजित बारोट यांच्या सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध


पुणे, दि. १९ – १४ व्या वसंतोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप उस्ताद शुजात खान यांचे सतारवादन आणि रणजीत बारोट (तालवाद्य) व सहकलाकार  यांच्या कलाविष्काराने झाला.

इमदादखानी घराण्याचे प्रसिद्ध सतार वादक उस्ताद शुजात खान यांनी आपल्या सतारवादनाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. इतक्या दिवसांनी प्रेक्षकांना समोर बघून खूप छान वाटले. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन सादरीकरण झाले पण प्रत्यक्ष सादरीकरण करून जो आनंद मिळतो तो ऑनलाइन सादरीकरणात नाही. ज्यांना आम्ही देवाहून मोठे मानतो असे रसिक भेटले की नवी ऊर्जा मिळते, अशा शब्दांत त्यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी राग श्याम कल्याण सादर केला.

पुरुष दुःखी असल्यावर शेरोशायरी लिहितात पण महिलांना दु:ख सहन करायची लहानपणापासून सवय असते, असे सांगत शुजात खान यांनी लाॅकडाऊनमध्ये स्वतः लिहिलेली ‘अभी तो मोहब्बत नयी नयी है…’ ही रचना पेश केली. त्यांनी सादर केलेल्या ‘छाप तिलक सब छिनी रे, मो से नैना मिलाई के…’या सुफी संत अमीर खुसरो यांच्या कवितेला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. मुकेश जाधव यांनी शुजात खान यांना तबल्यावर समर्थ संगत केली.

यानंतर पहिल्या दिवसाचा समारोप रणजीत बारोट यांच्या तालवाद्याच्या आविष्काराने झाला. मंदिरात येणारा प्रत्येक जण हा आपापल्या पद्धतीने प्रार्थना करीत असतो, तशीच प्रार्थना आज आम्ही करीत आहोत. वसंतोत्सवात यावर्षी सलग दुस-या वर्षी आम्ही सादरीकरण करीत आहोत याचा मनस्वी आनंद आहे. खास वसंतोत्सवासाठी मी काही सांगीतिक रचना तयार केल्या असून त्या आज इथे सादर करीत आहे, अशा भावना बारोट यांनी व्यक्त केल्या. या रचना ज्येष्ठ गायक सुरेश तळवलकर यांच्या कडून प्रेरणा घेत तयार केल्या असल्याचेही ते म्हणाले. ‘तुम दिनन के दाता…’, ‘मोरी लागी लगन…’ या रचनाया गृपने सादर केली. कोणताही आविष्कार वाद्ये आणि कविता यांचा मिलाफ असतो, तोच मेळ घालण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत असेही बारोट यावेळी म्हणाले. यावेळी अश्विन श्रीनिवासन यांनी बासरी, सुदीप जयपूरवाले यांनी गायन, मानसकुमार यांनी व्हायोलीन वादन, पॅरी यांनी रॅपर तर राजीव केंकरे यांनी ध्वनी संयोजन केले.    

Leave a Reply

%d bloggers like this: