‘वसंतोत्सव विमर्श’ मध्ये उलगडला ‘कानडा काफिला’

पुणे, दि. १९ – राग ‘कानडा’चा प्रवास उलगडत त्याचे विविध प्रकार, त्या प्रकारांचे वैशिष्ट्य आणि त्यातील सौंदर्य उदाहरणांसह जयपूर घराण्याचे बुजुर्ग गायक पं. सुधीर पोटे व डॉ. चैतन्य कुंटे यांनी रसिकांसमोर उलगडून दाखविले. निमित्त होते ‘वसंतोत्सव विमर्श’ या कार्यक्रमाचे.

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘वसंतोत्सव’ यंदा डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षपूर्ती सोहळा म्हणून साजरा होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा  ‘वसंतोत्सव विमर्श’ अंतर्गत गुरुवारी ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे ‘कानडा काफिला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात राग कानडाचे विविध प्रकार, कानडा अंगाचे राग यावर डॉ चैतन्य कुंटे सप्रयोग विवरण केले. त्यांनी कानडा रागाचे साधारण ३० पेक्षा अधिक प्रकार यावेळी सांगितले. “‘कानडा’ शब्दाचा उल्लेख काही ठिकाणी कान्हडा असा केला जातो, तर कुठे कानडा होतो. यात जसा कृष्ण एका बाजूला गीता सांगणार प्रगल्भ मार्गदर्शक असतो तर दुसरीकडे नटखट कृष्ण असतो तसाच हा दरबारी कानडा धीरगंभीर असतो तर दुसरीकडे त्याचे काही प्रकार हलके-फुलके आहेत. तसेच कानडा हा उल्लेख प्रांतवाचक असाही होतो.” असे कानडा शब्दामागील अर्थ त्यांनी सांगितले. अब्दुल करीम खाँसाहेब यांनी ‘बिन’ या वाद्यावर वाजवलेला दरबारी कानडा ही दुर्मिळ ध्वनिफीत त्यांनी ऐकवली. त्याचप्रमाणे मास्टर दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केळकर, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व आदी ज्येष्ठ कलाकारांनी सादर केलेल्या ‘कानडा’ रागाच्या धानिफिती त्यांनी ऐकविल्या. दरबारी कानडा हा राग तानसेन यांनी प्रचलित केल्याचे सांगत जयंत कानडा, साहबी कानडा, बास कानडा आदी दुर्मिळ रागांचीही माहिती यावेळी दिली.

तर दुसऱ्या सत्रात जयपूर घराण्याचे बुजुर्ग गायक पं. सुधीर पोटे यांनी कानडा रागाच्या विविध प्रकारांची, खानदानी बंदिशींची प्रस्तुती केली. यात दरबारी कानडा, सुहा कानडा, सुगराई कानडा, काफी कानडा, कौसी कानडा आदी १४ प्रकार सादर केले. त्यांच्या या प्रत्यक्षिकासाहित विवेचनाला रसिकांनी मनापासून दाद दिली. त्यांना मिलिंद पोटे (तबला) व सौमित्र क्षीरसागर (हार्मोनिअम) यांनी साथसांगत केली.

Leave a Reply

%d bloggers like this: