नागपूर – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहालयासाठी केंद्राकडून ४.२५ कोटींचा निधी वितरित

नवी दिल्ली, दि. 18 – नागपूरजवळील चिंचोळी येथील शांतीवन या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहालयासाठी केंद्र शासनाने 4.25 कोटी रूपयांचा निधी बुधवारी वितरित केला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती निमित्त नागपूरजवळील शांतीवन, (चिंचोळी) येथील बाबासाहेबांच्या स्मृती संग्रहालयाच्या पुनर्निर्माणासाठी केंद्र शासनाने वर्ष 2016 मध्ये 17.3 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी निधीचा 4.25 कोटी रूपयांचा पहिला हप्ता नोव्हेंबर 2016  मध्ये देण्यात आला. तर निधीचा 4.25 कोटी रूपयांचा दुसरा हप्ता बुधवारी 17 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला.

शांतीवनमधील संग्रहालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अस्ती जतन करून ठेवल्या आहेत. याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाजगी आयुष्याशी निगडीत जवळपास 400 पेक्षा अधिक वस्तू आहेत. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर वापरत असलेले कपडे यामध्ये सदरा, कोट, कुर्ते, टाय, मोजे आहेत. यासह वकीली करीत असतानाचा बॅरीस्टर गाऊन येथे आहे. त्यांचे हस्तलिखीत  पत्रे, ग्रामोफोन, छडी, टेबल-खुर्ची, पेन, टाइपराइटर अशा अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत.

शांतीवन, चिंचोळीच्या संग्रहालयाचे लोकार्पण येत्या 6 डिसेंबर 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होईल, अशी अपेक्षा डॉ.आंबेडकर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: