प्राणीमात्रांचे कल्याण चिंतन करणारे भारतीय वेदशास्त्र-प.पू. करवीर पीठ शंकराचार्य विद्याभारती सरस्वती यांचे मत

पुणे, दि. १७ – आपल्या सुखकर आयुष्याला उपयोगी पडेल अशी देणगी म्हणजे वेद आहेत. आज जगात वेदावर संशोधन होत आहे. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. सुखकर जीवनासाठी माणसावर संस्कार होणे गरजेचे असतात आणि ते संस्कार सनातन वैदिक संस्कृतीमध्ये दाखविले आहेत. वेदामध्ये दाखविलेले संस्कार हे फक्त भारतामध्येच दिसून येतात. सर्व प्राणीमात्रांचे कल्याण चिंतन करणारे वेदशास्त्र आहे म्हणून त्याचे महत्व आजही तितकेच आहे आणि पुढेही राहिल, असे मत प.पू. करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याभारती सरस्वती यांनी व्यक्त केले. 

नवग्रह मित्र मंडळाच्यावतीने कसबा पेठेतील मंडळाच्या गणेश मंदिरासमोर मंडळाच्या ७१ व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा आणि कोरोना योद्धांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मुक्ता टिळक, फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, नायडू हॉस्पिटलचे डॉ. विवेकानंद जाधव, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, मंडळाचे अध्यक्ष मानसिंग पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नायडू हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्स, कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, स्वच्छता सेवक, गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला.  

मुक्ता टिळक म्हणाल्या, कोरोनाकाळात डॉक्टरांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहेच परंतु, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणारा आणि संकटकाळात लोकांच्या मदतीला आलेला प्रत्येकजण हा कोरोनायोध्दा आहे. कोरोना हा रोग जगाला बरच काही शिकवून गेला. परंतु आता यासारखे रोग परत होवू नयेत यासाठी प्राथमिक गोष्ट म्हणजे स्वच्छता बाळगली पाहिजे. आपल्या शरीराबरोबर आपला परिसर देखील स्वच्छ ठेवला पाहिजे.

मानसिंग पाटोळे म्हणाले, कोरोनासारख्या महाभयंकर रोगाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर, पोलीस आणि सामाजिक संस्थांनी काम केलेच, परंतु अनेक व्यक्तींनी पुढे येवून सहकार्य केले. कुटुंबाचा विचार न करता अनेकजण समाजासाठी काम करत होते. त्यामध्ये अनेकांना प्राणही गमवावे लागले. अशा कोरोनायोद्धांचा आणि समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. इंदिरा पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: