चांगल्या आरोग्यासाठी स्वत:वर प्रेम करा – डॉ. पी. एन. कदम

पुणे, दि. १५ –  हल्ली अनेकांच्या जीवनशैलीमध्ये जबरदस्त बदल झाला आहे. खाण्यापिण्याच्या, विश्रांतीच्या सवयी बदलल्या आहेत. आहार-विहार विचारांच्या या अनियंत्रित सवयींबरोबरच फास्ट फूड, जंक फूडचा अतिरेक वाढत आहे. तसेच आजुबाजूचे पर्यावरण दुषित होत आहे त्याचाही परिणाम मानवी शरीरावर पडत आहे. चांगलं आरोग्य असेल तर आपल्या जीवनात आपण संपत्ती, उद्योग, शिक्षण, उत्साह या सगळ्या गोष्टींचा आनंद आपल्या आवडी आणि निवडीप्रमाणे करू शकतो. पण हे प्रत्येकाच्या जीवनात यावं आणि प्रत्येक व्यक्ती आनंदी, उत्साही, जीवन जगण्यास प्रेरित व्हावी यासाठी स्वत:वर प्रेम करता यायला हवे, स्वत:वर प्रेम केले तरच आपण दिर्घकाळ निरोगी जगण्याचा आनंद घेऊ शकतो असे प्रतिपादन डॉ. पी.एन. कदम यांनी केले.

व्हॅलेनटाइन डे निमित्त माय अर्थ फांउडेशन आणि स्वराज्ययज्ञ आयोजित “चला आरोग्यावर प्रेम करुयात” कार्यक्रमात डॉ. पी.एन. कदम मार्गदर्शन करत होते.

डॉ. कदम म्हणाले की, दैनदिन जीवनामध्ये आहारातील कस कमी झाल्यामुळे आपल्यातील रोगप्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. आपल्या आहार – विहार आणि विचारांच्या असंतुलन आणि असमतोलामुळेच मनुष्याचे आयुर्मान कमी होत आहे. दिर्घकाल निरोगी आयुष्यासाठी आपला आहार संतुलित हवा. आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त शाकाहाराचा समावेश असला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर खाणे आणि वेळेवर विश्रांती घेतली पाहिजे. यासर्व गोष्टीसाठी आपण सर्वात पहिले स्वत:वर प्रेम केले पाहिजे.

यावेळी माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, स्वराजयज्ञ समुहचे अभिजीत धुमाळ, प्रसाद चावरे, योग प्रशिक्षाक अभ्यासक विष्णू गंथडे, संकल्प मानव संसाधन आणि विकास संस्थेच्या संचालिका डॉ. अपुर्वा अहिरराव, दिशा शिंदे, शर्वरी डोंबे, प्रसाद बेलापूरकर उपस्थित होते.

अनंत घरत म्हणाले की, स्वत:बरोबर पर्यावरणावर प्रेम केले तरच निसर्ग आपली काळजी घेतो. त्यामुळे पर्यावरण रक्षण काळाची गरज असून माय अर्थ फांउडेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला जोडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत.

योग प्रशिक्षक विष्णू गंथडे म्हणाले की, योगा हा मनुष्याचा जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे. योगाच्या माध्यमातून शरीर, मन आणि मस्तक, पूर्ण शरीराचं स्वास्थ्य ठीक ठेवण्यास मदत होते. आरोग्य संपदा हि मोठी संपत्ती आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: