बालसाहित्यात अजूनही प्रयोगशीलता अपेक्षित – महावीर जोंधळे

पुणे- बालसाहित्य ही सहज सोपी गोष्ट नसून शब्दाल शब्द जोडून बाल साहित्याची निर्मिती होत नाही. बालकांच्या साहित्याला हात घालताना त्यांच्या मनोविश्वाचा, मानसशास्त्राचा अभ्यास करून बाल साहित्याची निर्मिती होणे अपेक्षित आहे. बाल साहित्याच्या बाबतीत पाश्चात्य देशांनी प्रयोगशीलता स्वीकरली असून भारतात देखील बालसाहित्यात अजूनही प्रयोगशीलता अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि बाल साहित्यकार महावीर जोंधळे यांनी व्यक्त केले.

अमरेंद्र- भास्कर मराठी बाल कुमार साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणा-या 2020-21 च्या राज्यस्तरीय उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कारांचे वितरण आज जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी भवनचे संचालक ज.गं. फगरे होते. यावेळी अमरेंद्र- भास्कर मराठी बाल कुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीत बर्वे, कोषाध्यक्ष डॉ.दिलीप गरूड, बालसाहित्यिक डॉ. न. म. जोशी, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कविता संग्रह, बाल कादंबरी, एकांकिका, विज्ञान, समीक्षा, शैक्षणिक, चरित्रात्मक, मुलांचे साहित्य अशा विविध वर्गवारीतून राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यशोदिप प्रकाशनातर्फे प्रकाशित प्रा. विश्वास वसेकर लिखित ‘बाल साहित्याचे अंतरंग’ या समीक्षा ग्रंथाला पहिला शंकर सारडा पुरस्कार देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना महावीर जोंधळे म्हणाले की, उद्याचा सुसंस्कृत नागरिक घडवण्याच्या दृष्टीने बाल साहित्यिकांनी बाल साहित्याची निर्मिती केली पाहिजे. बाल साहित्य हा चार भिंतींच्या आत बसून लिहिण्याचा प्रकार नसून समाजाच्या विविध वर्गात आणि विविध स्तरात मिसळून त्या अनुभवांववर आधारित साहित्य निर्मिती झाली पाहिजे. तरच बाल साहित्याची चळवळ अधिक सुदृढ होईल. बाल साहित्यिकांनी खुजेपणा सोडून मोकळेपणाने साहित्य निर्मिती केली पाहिजे. तसेच समकालीन बाल साहित्यिकांच्या वेळोवेळी भेटी घेऊन त्यांची बाल साहित्य निर्मिती मागील दृष्टी समजून घेत स्वतःच्या लेखणीला अधिक समृद्ध केले पाहिजे. बाल आणि कुमार साहित्यातील फरक समजावून सांगण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन देखील केले गेले पाहिजे. विं.दा. करंदीकर, राजा मंगळवेढेकर, गोपीनाथ तळवलकर, मालतीबाई बेडेकर अशा साहित्यिकांच्या संपर्कात मी आल्याने माझ्या मनात बाल साहित्याची बीजे रोवली गेली. बाल साहित्य निर्मिती करताना बालकांना गृहित न धरता त्यांच्या पातळीवर उतरून आपण काम केले पाहिजे. विज्ञानकथा, गूढकथा, चमत्कारीक कथा या सर्व साहित्य रसांचा मागोवा घेत बाल साहित्याची निर्मिती केली पाहिजे.

यावेळी बोलताना न.म. जोशी म्हणाले की, शिक्षकी पेशात असल्या कारणाने विद्यार्थ्यांशी येणा-या संपर्कामुळे मी त्यांची मने वाचू शकलो आणि त्यामुळेच मी बाल साहित्याची निर्मिती करू शकलो. बाल साहित्यिकांनी शिकवण्याच्या भूमिकेतून बाल साहित्य निर्मिती न करता, त्यांच्या बाल साहित्याच्या निर्मितीतून अप्रत्यक्षपणे मूल्य शिक्षण दिले पाहिजे. मानसशास्त्रीय मान्यतेनुसार भय, वात्सल्य, भूक, काम अशा चौदा सहज प्रवृत्ती मनुष्य जन्मतःच सोबत घेऊन येत असतो. त्या सहज प्रवृत्तींचे उदात्तीकरण करून स्वतःच्या व्यक्तिमत्वासह राष्ट्र, देश याचा विकास साधला जाईल, ते खरे बाल साहित्य होय.

यावेळी बोलताना किरण केंद्रे म्हणाले की, बाल साहित्य निर्मिती प्रक्रीयेमध्ये कथेच्या सशक्त आशाया सोबतच परिणामकारक सादरीकरण हे देखील तितकेच आवश्यक आहे. सध्याच्या बाल साहित्यिकांनी त्यांच्या बालपणीच्या गोष्टी म्हणजे बाल साहित्य असे गृहित न धरता सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वावरणा-या बालकांच्या विषयांना हात घालून बाल साहित्य निर्मिती केली पाहिजे. मुलांच्या वाचनाची भूक खूप मोठी असून त्यांच्या भावविश्वाशी संवाद साधेल, असे बाल साहित्य निर्माण झाले पाहिजे. त्यांचा बुध्द्यांक, भावनांक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून तर्कशुद्ध पिढी घडविण्यासाठी बाल साहित्याची निर्मिती केली पाहिजे. भरमसाठ बाल साहित्य निर्मितीपेक्षा दर्जेदार बाल साहित्याची निर्मिती व्हावी. वाईट-चांगले असे सर्वच विषय मुलांसमोर येणार असल्याने विषयाचे बंधन न मानता बालकांची अभिरूची घडविणारे बाल साहित्य निर्माण करणे ही लेखकांची जबाबदारी आहे.

कविता मेहेंदळे आणि निर्मला सारडा यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
हिंदी भवनचे संचालक ज.गं. फगरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरेंद्र- भास्कर मराठी बाल कुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीत बर्वे यांनी केले. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष डॉ.दिलीप गरूड यांनी केले. नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: