पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ‌यांची IGR पुणे येथे बदली, राजेश पाटील नवे महापालिका आयुक्त

पुणे, दि. 12 – मागील काही दिवसांपास चर्चेत असलेले पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ‌यांची आज (शुक्रवारी) अखेर राज्य सरकारने नोंदणी महानिरीक्षकपदी (IGR) पुणे येथे बदली केली आहे. त्यांच्याजागी ओडिसा केडरचे राजेश पाटील यांची पिंपरी महापालिका आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

हर्डीकर यांचा महापालिकेतील पावणे चार वर्षाचा कार्यकाळ संमिश्र राहिला.पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेत आयुक्त असलेले श्रावण हर्डीकर यांना पिंपरी पालिकेत आयुक्त म्हणून पाठविले होते. 27 एप्रिल 2017 रोजी हर्डीकर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला होता. हर्डीकर आपल्या तीन वर्ष नऊ महिन्याच्या कार्यकाळात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. भाजपचे प्रवक्ते, दलाल, घरगडी, भाजपधार्जिणे अशी विरोधकांची शेलकी विशेषणे, थेट भ्रष्टाचारात सहभागाचे आरोप, सत्ताधाऱ्यांना सातत्याने अनुकूल भूमिका घेणे. भाजपच्या पक्ष कार्यालयात जाणे यामुळे आयुक्तांवर भाजपधार्जिणे असल्याचा शिक्का बसला होता. त्यांची कारकिर्द चर्चेची राहिली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपने देखील त्यांच्यावर तोंडसूख घेतले. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप केला होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हर्डीकर यांची तत्काळ बदली होईल. अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, कोरोनाचे संकट आले. त्यामुळे त्यांची बदली लांबणीवर पडली. हर्डीकर यांनी शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे त्यांची बदली केली नव्हती.पण, गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी विरोधात जावू लागले. टार्गेट होवू लागल्याने आयुक्तांनी बदलीसाठी प्रयत्न सुरु केले होते. हर्डीकर यांना 1 जानेवारी रोजी सचिवपदी बढती मिळाली आहे. त्याचवेळी त्यांची बदली होईल असे मानले जात होते.परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना मुदतवाढ दिल्याचे सांगितले गेले. त्यानंतर भाजपचा आयुक्त विरोध तीव्र झाला. त्यामुळे आयुक्तांनी बदलीसाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले. आज अखेर त्यांची बदली झाली आहे. पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकपदी या पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी राजेश पाटील यांची पिंपरी महापालिका आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: