fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

मराठयांच्या २५० व्या दिल्ली विजयानिमित्त पुण्यात आनंदोत्सव

पुणे : हर हर महादेव…जय भवानी, जय शिवाजी… च्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठयांच्या दिल्ली विजयाला २५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने २५० दीप प्रज्वलित करुन शिवरायांना आणि मराठा सरदारांना अनोखी मानवंदना देखील देण्यात आली. 

निमित्त होते, इतिहास प्रेमी मंडळातर्फे शिवाजीनगर परिसरातील एसएसपीएमएस च्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आयोजित आनंदोत्सव कार्यक्रमाचे. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वारसदार विक्रमसिंह मोहिते, सरदार विसाजीकृष्ण बिनिवाले यांचे वारसदार सुहास बिनिवाले, अनघा बिनिवाले, शशिकांत बिनिवाले, स्वामिनी मालिकेत माधवराव पेशवे यांची भूमिका साकारणारा युवा कलाकार चिन्मय पटवर्धन, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते. 

मराठयांच्या दिल्ली विजयाला २५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शिवप्रतिमेचे पूजन करुन व दिवाळी साजरी करुन या आनंदोत्सव करण्यात आला. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान माधवराज पेशवे आणि सरदार महादजी शिंदे यांचा पोशाख परिधान केलेल्या भूषण पाठक आणि सिद्धार्थ दाभाडे या युवकांनी यावेळी शिवरायांचे स्मरण केले.

मोहन शेटे म्हणाले, पानिपतच्या मैदानावर सन १७६१ मध्ये मराठयांनी अतुलनीय पराक्रम केला. परंतु त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला. मात्र, त्यानंतर अवघ्या १० वर्षात सन १७७१ मध्ये मराठा साम्राज्याचे पंतप्रधान माधवराज पेशवे आणि सरदार महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी दिल्लीवर भगवा झेंडा फडकवला. त्याघटनेला यावर्षी २५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यामध्ये पेढे वाटून देखील आनंदोत्सव करण्यात आला.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading