Friday, October 23, 2026
PUNETOP NEWS

सांस्कृतिक संवादासाठी महापालिका मदत करेल – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे – पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि वाढविण्यासाठी महापालिका कलाकारांना सर्वतोपरी मदत करेल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. कलाकारांनीही संवादासाठी एकत्र यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुणे शहराच्या विकासाच्या चर्चेत वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांचे सक्रिय योगदान असावे या भावनेने स्थापन झालेल्या ‘क्लब ऑफ इन्सपायरर पुणे’ (सीओआयपी) मध्ये नामवंत कलाकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये ते बोलत होते. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळिक विशेष आमंत्रित होते.

ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे, ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे, गायक राहुल देशपांडे, लेखक प्रसाद शिरगावकर, मिलिंद कुलकर्णी, आदित्य जोशी, तेजस्विनी साठे आदींनी सांस्कृतिक क्षेत्राच्या अपेक्षा महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यावर उत्तर देताना मोहोळ आणि रासने यांनी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. विशेषतः बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासामुळे पुण्याला अत्याधुनिक दर्जाचे नवे सांस्कृतिक दालन खुले होईल, असे महापौरांनी सांगितले. रासने यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकात कला अकादमीसाठी केलेल्या तरतूदीची माहिती देताना, अकादमीमध्ये गायन, नृत्य, प्रायोगिक नाटक यासाठी पूरक प्रेक्षागृहे, प्रशिक्षण केंद्र करणार असल्याचे सांगितले. मुळीक यांनी भविष्यातील विस्तार आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या, अडचणी ध्यानात घेऊन सांस्कृतिक क्षेत्रातही विकासाचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.

त्याआधी झालेल्या चर्चेत पं. घाटे म्हणाले, कोविडमुळे आजही सांस्कृतिक क्षेत्र पूर्ववत सुरू झालेले नाही. शहरात कलाकारांना जागा आणि प्रायोजकत्व मिळवण्यासाठी अनेक समस्या येतात, उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही या प्रश्नांवर महापालिकेने कलाकारांना मदत करायला हवी. तसेच शहरातील विविध महाविद्यालयातील कलेच्या विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एखादा कार्यक्रम महापालिकेने घ्यायला हवा.

नृत्यगुरू साठे यांनी पालिकेने नृत्य संकुल उभे करून पालिका शाळांमध्ये मुलींना शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण देण्याची संकल्पना मांडली. राहुल देशपांडे यांनी छोट्या आकाराच्या प्रेक्षागृहांची गरज मांडली. प्रसाद शिरगावकर यांनी कलाकारांसाठीच्या सार्वजनिक कट्ट्यांची आवश्यकता महापालिकेसमोर मांडली.

गप्पांमध्ये लोकसत्ताचे संपादक मुकुंद संगोराम, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, सकाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, सूत्रसंचालक मिलिंद कुलकर्णी, अश्विनी तेरणीकर आदी सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद सातव यांनी तर सूत्रसंचालन शीतल पवार यांनी केले.
.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading