पालिकेत नव्याने येणाऱ्या गावात अनधिकृत बांधकामाचा धडाका

पुणे, दि. ९ – पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या बावधन बुद्रुक गावात अनधिकृत,विना परवाना बांधकामाचे पेव फुटले असून धोकादायक पद्धतीने घाई गडबडीने रात्रंदिवस बांधल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामाची पीएमआरडीए कडे तक्रार करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे .संभाव्य कारवाईच्या भीतीने ही अनधिकृत बांधकामे वेगाने बांधली जात आहेत.

बावधन बुद्रुक येथील रहिवासी नंदू दत्तोबा केसवड,वसंत दत्तोबा केसवड,रमेश दत्तोबा केसवड यांनी त्यांच्या शेजारी रात्रंदिवस सुरु असलेल्या धोकादायक अनधिकृत आणि निकृष्ट बांधकामाची तक्रार बावधन ग्राम पंचायत,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए),पुणे पालिका तसेच हिंजवडी पोलिसांकडे दिली आहे.

अश्विनी सुरेश दगडे, पंकज सुरेश दगडे, राहुल सुरेश दगडे तसेच बांधकाम ठेकेदार योगेश भरत आमले यांच्या विरोधात ही तक्रार असून बावधन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत सर्व्हे नंबर ३१/७ येथे विनापरवाना बांधकाम सुरु असून धोकादायक पद्धतीने चालेलेले हे बांधकाम,स्लॅब पडून केसवड यांच्या वाहनांचे नुकसान झालेले आहे. दगडे कुटुंबीय आणि ठेकेदार आमले यांच्याकडून जिवीतालाही धोका निर्माण झालेला आहे. यासंदर्भात हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये दगडे कुटुंबीय आणि ठेकेदार आमले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तक्रारी दाखल करूनही अनधिकृत बांधकाम सुरूच आहे.

या विनापरवाना बांधकामाची कायदेशीर दफ्तरी नोंद करू नये, बांधकाम थांबवून पाडण्याची कायदेशीर कारवाई करावी, असेही केसवड कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: