Saturday, May 30, 2026
PUNETOP NEWS

आत्मनिर्भरतेला जीवनमूल्यांच्या शिक्षणाची जोड हवी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे : “नवीन शिक्षण धोरणात अनेक नाविन्यपूर्ण तरतुदी आहेत. मातृभाषेतून शिक्षण, सैद्धांतिक मूल्यांचा अंतर्भाव केला आहे. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आत्मनिर्भरतेचे वातावरण आहे. या आत्मनिर्भरतेला जीवनमूल्यांची जोड देण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. जीवनमूल्यांच्या अनुकरणातूनच रामराज्य साकार होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या २३ व्या स्थापना दिवसानिमित्ताने सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. बावधन (पुणे) येथील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमधील सुर्यभवन येथे झालेल्या या सोहळ्याला नालंदा विद्यापीठाचे कुलपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. लोकेश मुनिजी, भजनसम्राट अनूप जलोटा, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद, सुर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.

‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ स्वर्गीय डॉ. टी. बी. सोलाबक्कणवार (कला आणि संस्कृती), ज्येष्ठ चरित्र अभिनेते किरण कुमार (भारतीय सिनेमा), अभया श्रीश्रीमल जैन (जागतिक उद्योजकता), डॉ. मुकुंद गुर्जर (विज्ञान आणि तंत्रज्ञान), विक्रम राजदान (दिग्दर्शक आणि निर्माता), डॉ. आर. एम. अग्रवाल (वैद्यकीय समाजसेवा), कृष्ण प्रकाश (सार्वजनिक सेवा, आरोग्य आणि तंदुरुस्ती), ज्योत्स्ना चोपडा (पर्यावरण संवर्धन व नैसर्गिक फळभाज्या) यांना प्रदान करण्यात आला.

‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ पंडित विजय घाटे (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अद्याशा दास (पर्यटन आणि भारतीय हेरिटेज), अजिंक्य देव (भारतीय सिनेमा), साजन शाह (प्रेरक वक्ता), लावण्या राजा (जागतिक उद्योजकता), रिया जैन (ललित कला- चित्रकला), राधिका ए जे (सर्जनशील कला) यांना प्रदान करण्यात आला.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कोणत्याही कामात समर्पण, कठोर मेहनत हवी. उद्योजकतेची अनेक क्षेत्रे आज खुणावत आहेत. त्या संधींचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या कामात प्रामाणिकता, पारदर्शकता हवी. केंद्र सरकारच्या कामातून आपण गेली सहा वर्षे पारदर्शकता पाहत आहोत. पद्म पुरस्कार हे त्याचे मूर्तिमंत उदहरण आहे. खेड्यातील मुले आयएएस, आयपीएस होताहेत. त्यामुळे मातृभाषेचा आग्रह धरावा.”

डॉ. विजय भटकर म्हणाले, “मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण असायला हवे. आपल्या देशात अनेक भाषा असून, सर्व भाषा प्रगल्भ आणि त्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. अनेक देशात फिरल्यानंतरही आपण आपल्या खेडेगावांसाठी काय करू शकतो, हा प्रश्न पडत असे. आपली विद्यापीठे ज्ञानाची दालने असली पाहिजेत. सर्वांगीण आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या संस्थांची आज गरज आहे. सुर्यदत्तासारख्या हे काम अतिशय तळमळीने करताहेत, याचा आनंद वाटतो.”

रझा मुराद म्हणाले, “आज दोन लहान मुलींना पुरस्कार देताना मला आनंद होतोय. ज्या घरात मुली असतात, ते घर नेहमी प्रगती करते. त्यांच्या पालकांनी त्यांच्यातले कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांचे अभिनंदन करतो. किरण कुमार आणि मला चित्रपट सृष्टीत यावर्षी ५० वर्ष पूर्ण झाली. खूप मेहनत आणि परिश्रम करून आम्ही इथे पोहचलो. आयुष्यात समर्पित वृत्तीने काम करावे लागते.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कोरोनाने आपल्याला स्वतःबरोबरच सामाजिक भान जपत योगदान देणे आवश्यक आहे, हे शिकवले. मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार व्हावेत, त्यांची बौद्धिक, मानसिक तसेच भावनिक वाढ व्हावी, त्यांची सर्वांगीण जडणघडण व्हावी, याकरिता त्यांना विविध क्षेत्रातील लोकांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला हवी. त्याच उद्देशाने सुर्यदत्ता जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातून ही आदर्श व्यक्तिमत्त्व समोर आणत असतो.”

आचार्य लोकेश मुनीजी यांनीही मार्गदर्शन केले. किरण कुमार, अजिंक्य देव, तरुण कुमार चौधरी, अभयकुमार जैन, रिया जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. अनुप जलोटा यांच्या लाईव्ह भजन गायनाने कार्यक्रमात रंगत आणली. शिल्पा भेंडे आणि सिद्धांत चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading