सागराला देखील अनन्यसाधारण महत्त्व देणे आवश्यक – संजय बारू
पुणे, दि. ३ – आपण नेहमीच भूमीला महत्त्व दिले गेले आहे, मात्र आर्थिक व सुरक्षेचा विचार करीत सागराला देखील अनन्यसाधारण महत्त्व देणे गरजेचे आहे. शिवाय देशाचा विचार करीत भूमीबरोबरच सागरी अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रटेजिक स्टडीजच्या जिओइकोनॉमिक्सचे माजी संचालक व फिक्कीचे माजी महासंचालक संजय बारू यांनी व्यक्त केले. अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयात काम करणा-या पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी) व नीरध्वनी टेक्नॉलॉजी यांच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात बारू बोलत होते.
मेरिटाईम रिसर्च सेंटरच्या वतीने अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस (युडीए) फ्रेमवर्क फॉर इफेक्टिव्ह ब्लू फ्रंटिअर्स इन द इंडियन ओशन रिजन (आयओआर) या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय तटरक्षक दलाचे माजी महासंचालक व्हाईस अॅडमिरल एम पी मुरलीधरन (निवृत्त), जपानमधील सासाकावा पीस फाउंडेशन व ओशन पॉलिसी रिसर्च विभागाचे संचालक डॉ. टोमोनारी अकामत्सू, भारत सरकारचे माजी विशेष सचिव प्रताप हेबळीकर, मेरिटाईम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास, सल्लागार प्रफुल्ल तलेरा आदी उपस्थित होते. अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयावरील ‘युडीए डायजेस्ट’चे प्रकाशन देखील या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.
या वेळी बोलताना बारू म्हणाले, “हिंद महासागरामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूच्या रूपात मोठ्या प्रमाणात उर्जा स्त्रोत उपलब्ध असूनही भारत आज निर्यात होणा-या हायड्रोकार्बन उर्जेवर अवलंबून आहे. भारतीय धोरणकर्ते, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकारांना ही बाब लक्षात घेतली पाहिजे, याशिवाय सागरातील पायाभूत सुविधा, संशोधन व विकास यांना चालना देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन करायला हवे. हे करीत असताना परकीय गुंतवणूक महत्त्वाची ठरू शकेल.”
एम पी मुरलीधरन म्हणाले की, सागरी जैवविविधतेबरोबरच हिंद महासागराचा भाग हा व्यापाराच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे. जागतिक व्यापाराचा विचार केला तर तब्बल ६५% व्यापार हा येथूनच होतो. त्यामुळे या भागातील सागरी वाहतूक मार्गांवर कोंडी होणार नाही याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. चीन प्रमाणे अनेक देश हिंद महासागरात आपले स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असताना भारतानेही याला ठामपणे प्रत्युत्तर दिले पाहिजे. याशिवाय भारतीय किनारपट्टीवरील लँडिंग पॉईंट्सचे परीक्षण करीत दहशतवाद, चाचेगिरी, मानवी तस्करी आणि बेकायदेशीर मासेमारी आदी आव्हाने प्राधान्याने घेतली पाहिजेत.
महासागरातील ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम लक्षात घेत जपानने ‘कोस्टल ब्लू कार्बन’ परिसंस्थेवर भर दिला असून या संदर्भात डॉ. टोमोनारी अकामत्सू यांनी विस्ताराने माहिती दिली.
आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सागरी प्रबोधनाचा समावेश करणे आज गरजेचे असून नागरिकांमध्ये सामरिक जागरूकता देखील वाढायला हवी, असे मत प्रताप हेबळीकर यांनी व्यक्त केले. प्रफुल्ल तालेरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अर्नब दास यांनी अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयाचे महत्त्व विषद करीत मेरिटाईम रिसर्च सेंटरच्या उपक्रमांची माहिती दिली.