महाराष्ट्र साहित्य परिषदेची ‘साहित्य विशारद’ ही पदवी अनेकांनी प्राप्त करावी : प्रा. मिलिंद जोशी


पुणे : शिक्षक हा भाषाप्रेमी असला पाहिजे. शिक्षकाची भाषा अधिक समृद्ध असेल तर पुढील पिढीलाही भाषेची अधिक गोडी लागेल त्यासाठी एकेकाळी शिक्षकांमध्ये प्रतिष्ठेची असलेली परिषदेची ‘साहित्य विशारद’ ही पदवी अनेकांनी प्राप्त करावी. त्यासाठी प्रयत्न करावेत असे मत प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी परीक्षा घेण्यात येतात. २०१९-२०२० यावर्षी घेण्यात आलेल्या ‘साहित्य विशारद’ या परीक्षेमध्ये श्रीकांत चौगुले हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, परीक्षा विभागाचे कार्यवाह प्रा. माधव राजगुरू उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, एकेकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परीक्षा देणे हे लोकांना प्रतिष्ठेचे वाटत होते. अनेक शिक्षक आणि प्राध्यापक यांनी ह्या परीक्षा दिल्या आहेत. आजही या परीक्षांना तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांनी ह्या परीक्षा देणे अत्यंत महत्वाचे आहे.

प्रा. माधव राजगुरू म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परीक्षांना ८२ वर्षांची परंपरा लाभली आहे. ‘साहित्य विशारद’ ही एकेकाळी प्रतिष्ठा लाभलेली परीक्षा खंडित झाली होती. अभ्यासक्रमाची पुनर्रचना करून ती पुन्हा सुरु केली. या परीक्षेला अनेकांचा प्रतिसाद मिळत आहे. ‘साहित्य विशारद’ परीक्षेला भविष्यकाळात उत्तम प्रतिसाद मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील. 

Leave a Reply

%d bloggers like this: