स्वरकाल चक्रावर मुद्रा उमटवलेला स्वर म्हणजे अण्णा – डॉ. शंकर अभ्यंकर

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ

पुणे, दि. ३ – जसे ऋतुमानाचे कालचक्र असतात, तसे संगीतातील कालचक्रावर आपली चिरकाल मुद्रा उमटवणारे किराणा घराण्याचे गायक म्हणजे अण्णा. पंडित भीमसेन जोशी अर्थात अण्णांच्या स्वराला सिद्धी लाभलेली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, अशी भावना विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

बालगंधर्व रंगमंदिर येथे संवाद, पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभ आज करण्यात आला. त्यावेळी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर 40 वर्षे साथसंगत करणारे ज्येष्ठ टाळ वादक माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कार विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी डॉ. शंकर अभ्यंकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर श्रीनिवास भीमसेन जोशी, विराज श्रीनिवास जोशी, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, किराणा घराण्यातील गायिका मीना फातर्पेकर, गायिका सानिया पाटणकर, गायक उपेंद्र भट, समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष राजेश पांडे, संवाद, पुणेचे प्रमुख सुनील महाजन, संवाद, पुणेच्या निकीता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोतलाना डॉ. शंकर अभ्यंकर म्हणाले की, गायनाच्या क्षेत्रात अनेक घराणी आहेत.अण्णांनी किराणा घराण्याचा ध्वज ज्या एका उंचीवर नेऊन फडकावला आहे, त्याला तोड नाही. सर्व घराण्यांचा एकत्रित अनुभव अण्णा त्यांच्या सादरीकरणातून परिपूर्ण पद्धतीने द्यायचे. अण्णांचा आवाज म्हणजे देवदत्त होता. संगीत क्षेत्रात अधिराज्य गाजविण्यासाठी अण्णांनी उपसलले कष्ट हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. भारताने संपूर्ण जगाला आध्यात्म आणि अभिजात शास्त्रीय संगीत या दोन मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत. या दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी संपूर्ण जगातून अनेक लोक भारतात येतात. ‘संतवाणी’व्दारे अण्णांनी संपूर्ण जगाला ब्रह्मानंद दिला.

जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ आणि सत्कार सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘कानन दरस करो’ या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि संगीताच्या विविध पैलूंवर रचलेल्या रचनांचे सादरीकरण श्रीनिवास भीमसेन जोशी आणि विराज श्रीनिवास जोशी यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ युवा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष राजेश पांडे यांनी केले. संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली.

Leave a Reply

%d bloggers like this: