आयुर्वेद ही पूर्व प्रतिबंधात्मक व पूर्ण उपचारात्मक पद्धती – डॉ.रामचंद्र देखणे

पुणे : आपल्या वेदांमध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन पद्धती आहेत.  आजार होऊ नयेत, यासाठी कशी जीवनशैली असली पाहिजे आणि आजार झाले तर त्यावरील उपचार कसे करावेत अशा या दोन पद्धती आहेत. आयुर्वेद हे एकीकडे पूर्व प्रतिबंधात्मक आहे आणि त्याचबरोबर पूर्ण उपचारात्मक देखील आहे. या दोन्ही पद्धती जेव्हा एकत्र येतात तेव्हा उत्तम जीवनशैली निर्माण होते, ती आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे, असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. 

डॉ. पाईल्स क्लिनिक व मंगल फाऊंडेशनच्या वतीने कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन टेम्पल येथे सुश्रुत पुरस्कार प्रदान सोहळ््याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार चेतन तुपे, डॉ. शिवकुमार गोरे, डॉ. मिलिंद भोई, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पाईल्स क्लिनिकचे डॉ. कुणाल कामठे, डॉ शर्मिला कामठे आदी उपस्थित होते. सोहळयासाठी डॉ. युनुस सोलंकी, डॉ .सीमा पाटोळे ,डॉ.सार्थक पवार , डॉ .सुर्यकांत मुरुड, प्रदीप मोरे , पी.पी.ग्रुप,डॉ. देव यादव, डॉ. तुषार, सुनीता पाटेकर आदींचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमात डॉ. मधुभाई कोठिया (मुंबई), डॉ. सुभाष वर्ष्ने (अमरावती), डॉ. मीना शेख (पुणे) यांना सुश्रृत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर डॉ. कुलदीप कोहली (मुंबई), डॉ. गौरी बोरकर (मुंबई) यांना आयुर्वेद आयकॉन आणि डॉ. राजेश गुप्ता (सावंतवाडी), डॉ. महफुझूल्लाह काद्री (उस्मानाबाद) यांना सुश्रृत रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रोक्टोलॉजीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. व्यंकट भारद्वाज (हैद्राबाद), डॉ. प्रविण सहावे (नागपूर) यांनाही सन्मानित करण्यात आले. 

चेतन तुपे म्हणाले, आज अ‍ॅलोपॅथीला जास्त महत्व आले असले तरी सुश्रृत संहिता आणि चरक संहितेच्या आधारावर आयुर्वेद शास्त्र पुढे जात आहे. आपल्याकडे आलेला रुग्ण हा पूर्ण बरा व्हावा ही भावना ठेवून जो उपचार करतो त्याच्या हाती यश निश्चित असते. रुग्णांसाठी धीराचे चार शब्द, उपचारातील मायेचा ओलावा हा मशिनमध्ये नसतो. त्यामुळे फॉमेली डॉक्टर ही पूर्वीपासूनची संकल्पना अतिशय चांगली आहे. 

डॉ. कुणाल कामठे म्हणाले, आज मूळव्याध हा प्रत्येक घरात एका व्यक्तीला तरी असतो. त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी डॉ पाईल्स क्लिनिकच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. आद्य सुश्रृतांनी, आद्य चरकांनी ग्रंथातून आपल्याला आयुर्वेदाचा वारसा दिलेला आहे. त्याला आधुनिक उपचार पद्धतीची योग्य जोड दिली तर तितक्याच चांगल्या पद्धतीचे परिणाम आपल्याला मिळतील. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही आयुर्वेदाची परंपरा सर्वसामन्यांपर्यंत पोहचावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: