देशवासियांच्या कृतज्ञतेच्या जाणीवेमुळे सैनिकांच्या मनगटात बळ- सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ

पुणे, दि. २८ – देशाच्या सिमेचे रक्षण करण्याकरीता आयुष्यातील महत्वाची वर्षे सैनिक घालवितात. भारताचा झेंडा मानाने डौलत राहण्यामागे सैनिकांचे मोठे योगदान असते. त्यामुळे आपणही आपल्या चांगल्या कृत्यातून प्रत्येकाच्या ह्रदयात तिरंगा फडकत ठेवायला हवा. देशवासियांच्या कृतज्ञतेची जाणीव सैनिकांच्या मनगटात बळ आणते. त्यामुळे आपण सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी नेहमी उभे रहायला हवे, असे मत सामाजिक कार्यकर्ते व सैनिक मित्र परिवारचे आनंद सराफ यांनी व्यक्त केले. 


बँक आॅफ इंडिया स्टाफ युनियनतर्फे शनिपार शाखेवरील स्पोटर्स क्लब हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात पुणे युनिटमधील १८० माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युनियनचे अध्यक्ष उल्हास देसाई, जनरल सेक्रेटरी दीपक पाटील, सेक्रेटरी शिरीष राणे आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प असे सन्मानाचे स्वरुप होते.


आनंद सराफ म्हणाले, सैनिकांना त्यांच्या जीवनात मान व सुविधा मिळत असल्या, तरी देखील त्यांचे जीवन जोखमीने भरलेले असते. देशाच्या सिमांवर शत्रूपेक्षा निसर्गाशी त्यांचा अधिक सामना होतो. रक्षणासोबतच आरोग्यसेवा, रस्ते, पूल बांधणे ही देखील कामे सैन्यदल करते. सैन्यदलातील निवृत्तीनंतर ते जीवनाची दुसरी लढाई लढतात. त्यामुळे याकाळात देखील आपण त्यांच्यासोबत असायला हवे. 


उल्हास देसाई म्हणाले, तिन्ही सैन्यदलात १५ ते २० वर्षे देशसेवा केल्यानंतर बँकेद्वारे सामान्य जनतेला सेवा देणा-यांना वंदन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिरीष राणे म्हणाले, बँकेच्या पुणे युनिटमध्ये १८० माजी सैनिक कार्यरत आहेत. अनेकांचा भारतीय सैन्यदलाने गौरव देखील केला आहे. त्यांना आम्ही यानिमित्ताने अभिवादन करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: