पीएमपीच्या दिनदर्शिकेचे केंद्रीय सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे, दि. 23 – पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएल कडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती देणाऱ्या आकर्षक स्वरूपातील दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन भारत सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यास महामेट्रोचे ब्रजेश दीक्षित, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस सहआयुक्त रविंद्र शिसवे, पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

पीएमपीएमएल दिनदर्शिका २०२१ मध्ये पीएमपीएमएल कडून पुणे व पिंपरी-चिंचवड ही दोन प्रमुख शहरे, शहरांलगतची उपनगरे व पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशी नागरिकांसाठी ज्या १३ डेपोंमधून बससेवा दिली जाते त्या १३ डेपोंची माहिती,पीएमपीएमएल ने नव्याने सुरू केलेल्या पाच रुपयात पाच किमी पर्यंतच्या प्रवासासाठी अटल बससेवा , पुणे विमानतळासाठी ‘अभि’ असा ब्रँडिंग केलेली वातानुकूलित ई-बससेवा, लांब पल्ल्यांच्या मार्गांवरती ‘लिमिटेड बस स्टॉप असलेली’ वातानुकूलित ई-बसने पुरवली जाणारी जलद बससेवा, पुणे व पिंपरी-चिंचवड शहारांलगतच्या उपनगरांतील नागरिकांसाठी ‘लास्ट मॅन कनेक्टिव्हिटी’ हा मंत्र घेऊन सुरू केलेली डेपो फीडर अंतर्गत असलेली ‘अटल बससेवा’ या नवीन योजनांची थोडक्यात माहिती दिली आहे.

न. ता. वाडी व स्वारगेट डेपोत सोलर सिस्टिमद्वारे केलेल्या ७५ किलोवॅट वीजनिर्मिती बाबतची माहिती, ई तिकीट सेवा प्रणाली याविषयी त्याचबरोबर तेजस्विनी बस, सीएनजी बस, वातानुकूलित स्मार्ट ई बस या बसेसची चित्रमय माहिती व पुणे दर्शन बससेवा, बीआरटी रेनबो बससेवा, रातराणी बससेवा यासह महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या स्वमालकीच्या व भाडे तत्त्वावरील सीएनजी, डिझेल व स्मार्ट ई बसेसची एकूण संख्या याबाबत देखील दिनदर्शिकेत माहिती दिली आहे. केंद्र सरकरच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी पीएमपीएमएल च्या या माहितीपर, चित्रमय व आकर्षक दिनदर्शिकेचे कौतुक करून पीएमपीएमएल ने नव्याने सुरू केलेल्या योजनांची देखील प्रशंसा केली.

Leave a Reply

%d bloggers like this: