‘करीना आली’ गाण्याच्या निमित्ताने दिसणार पल्लवी पाटीलच्या दिलखेचक अदा

“करीना…करीना…करीना”, असा आवाज लवकरच सगळीकडे घुमणार कारण ‘एका गावात करीना आली सा-या गावात धमाल झाली’. आतापर्यंत ‘करीना’ हे नाव उच्चारलं की बॉलिवूडची ‘बेबो’ आठवते पण आता मात्र आपल्या मराठीत पण मराठमोळी करीना आली आहे हं, जिच्या मागे सारा गाव दिवाना झाला आहे. नेमकी ही ‘करीना’ कोण असा प्रश्न हमखास अनेकांना पडला असावा. तर ही ‘करीना’ म्हणजे अभिनेत्री पल्लवी पाटील.

लग्नसराई सुरु झाली आहे आणि आता लवकरच झीप्लेक्सवर ‘बस्ता’ बांधला जाणार आहे. सुनिल राजाराम फडतरे निर्मित आणि तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बस्ता’ या सिनेमातील ‘करीना आली’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. डान्स नंबर असलेलं हे गाणं पल्लवी पाटीलवर चित्रित करण्यात आले असून या गाण्याच्या तालावर पल्लवीसोबत अभिनेते सुरज पवार आणि अरबाझ शेख थिरकताना दिसतील.

‘करीना आली’ हे गाणं अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे आणि ती विशेष कारणं आहेत पल्लवीची दिलखेचक अदा, तिचे सौंदर्य, गाण्याचे बीट्स जे प्रत्येकाला डान्स करण्यासाठी ऑन फ्लोअर जायला भाग पाडतील आणि गाण्याचे बोल, संगीत आणि आवाज. नेहमी पेक्षा वेगळं काहीतरी सर्वांना नक्कीच हवं असतं पण गाण्यांच्या बाबतीत असा एक गायक आहे जो वेगळ्या पध्दतीच्या गाण्यांची निवड करुन, ती गाऊन, सतत बॅक टू बॅक हिट देतो आणि दमदार आवाज असलेला तो गायक म्हणजे नकाश अझीझ. नकाशने ‘करीना आली’ हे गाणं गायले आहे आणि आता हे गाणं पण हिट होणार यात शंका नाही. मंगेश कांगणे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत तर संतोष मुळेकर हे या गाण्याचे संगीतकार आहेत.

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स यांची प्रस्तुती असलेला ‘बस्ता’ हा सिनेमा २९ जानेवारीपासून झीप्लेक्सवर पाहायला मिळेल.

Leave a Reply

%d bloggers like this: