नवा समाज घडवायचा असेल तर प्रबोधनकारांच्या विचारांना पुढे नेलेच पाहिजे – सुशीलकुमार शिंदे

पुणे : प्रबोधनकारांनी आयुष्यात ढोंगी लोकांचा पर्दाफाश केला. समाजसुधारणेवर प्रबोधनकारांचा नेहमी भर असायचा. नवा समाज घडवायचा असेल तर प्रबोधनकारांच्या विचारांना पुढे घेऊन गेलेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त करून जात-धर्म या पेक्षा मानवता खूप मोठी आहे हे आजच्या तरुणांना सांगितले पाहिजे, असेही नमूद केले.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात आज सायंकाळच्या सत्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विषयी व्यक्त केलेल्या भावनांवर आधारित ‘पुत्र सांगती चरित पित्याचे’ या प्रथमच प्रदर्शित होत असलेल्या ध्वनिचित्रफितीचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, सचिन इटकर, किरण साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी पुण्यात आणि तेही आरएसएसच्या अड्ड्यात साजरी होत आहे ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगून सुशीलकुमार शिंदे म्हणाले, समाजातील वाईट घटनांबाबत प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहबे ठाकरे यांनी कडाडून टीका केली पण त्यांच्या विरोधात बोलण्याचे कुणाचे धाडस झाले नाही. सत्य हे बराच काळ टिकत असते, काही वेळेस ते बुडून चालले आहे की काय असे वाटते पण ते परत वर येते ते जिवंतपणाने येते.

सध्याच्या राज्यातील सरकारविषयी टिप्पणी करताना शिंदे म्हणाले, शिवसेनेने हिंदुत्वाला मुरड घातली आहे का असा प्रश्न विचारला जातो पण शिवसेनेने हिंदुत्वाला मुरड घातलेली आहे असे वाटत नाही. उद्धव ठाकरे हे त्यांच्या आजोबांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन सरकारात आले आहेत. आजचे सरकार सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारे सरकार आहे.

ज्ञानेश महाराव यांनी ‘पुत्र सांगती चरित पित्याचे’ या चित्रफितीचा इतिहास उलगडून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. स्वागत रघुनाथ कुचिक, किरण साळी, सचिन इटकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले.

बाळासाहेब ठाकरे यांचे मनोगत, टाळ्या आणि हशा..

बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे कसे होते यावर प्रकाश टाकणार्‍या ‘पुत्र सांगती चरित पित्याचे’ या ध्वनिचित्रफितीमुळे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकायला मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकारांविषयी छोटे छोटे किस्से सांगून त्यांची महती कथन केली. प्रबोधनकारांचा हिंदुत्वाला विरोध नव्हता पण त्यातील ढोंगीपणाला होता. ते सत्यशोधक होते. माणसाने देवासारखे वागावे आणि देवाने देवासारखे वागावे अशी त्यांची भूमिका होती, असे या चित्रफितीतून बाळासाहेब ठाकरे व्यक्त झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: