दिव्यांगांसोबत नववर्षानिमित्त ‘सूर्यदत्ता’चा जल्लोष!

पुणे, दि. १२ – सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांसाठी नुकताच ‘जल्लोष २०२१’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिला होता. गाण्यांचे सादरीकरण, भरपूर खाऊ आणि फुग्यांची उधळण यामुळे ही दिव्यांग मुले भारावून गेली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, तसेच ‘सूर्यदत्ता’ आणि ‘लायन्स क्लब’ या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या कार्यक्रमाने मुलांच्या आयुष्यात ‘जल्लोष’ भरला.


‘सूर नवा ध्यास नवा’ रियालिटी शो फेम आळंदीच्या चैतन्य देवढे याला मोहोळ यांच्या हस्ते ‘सूर्यगौरव संगीत युवारत्न राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी उद्योजक सीए राज देशमुख, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल सीए अभय शास्री, माधुरी शास्त्री, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके आदी उपस्थित होते. 


मुरलीधर मोहोळ म्हणाले, “चैतन्यचे गायन अतिसुंदर आहे. भविष्यातील तो एक प्रतिभावान गायक असून, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अल्प वयात आपल्या सुरेल गायनाने त्याने असंख्य रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे. त्याच्याकडून उत्तमोत्तम रचना आपल्याला ऐकायला मिळोत.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सर्व मुलांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले, “चैतन्यमधील ऊर्जा आणि प्रतिभा वाखाणण्याजोगी आहे. त्याने आपल्या सादरीकरणातील सातत्य ठेवण्यासह त्यात सर्वोत्कृष्टता आणावी. भविष्यात त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गायन करताना पाहण्याची इच्छा आहे.”
चैतन्यने रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्त करताना रसिकांचे उदंड प्रेम व आशीर्वाद असेच कायम राहावेत, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी ‘मागू कसा मी’ आणि ‘देवाक काळजी रे’ ही गाणी सादर करत चैतन्यने उपस्थितांची मने जिंकली. त्याने सादर केलेल्या गाण्यांवर मुलांनी नृत्य करत जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले, तसेच विविध भेटवस्तू आणि अल्पोपोहाराचा आनंद घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: