Saturday, June 13, 2026
PUNE

व्यसनाधिन व्यक्तिला व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणणे ही आपली सामाजिक जबाबदारी – मुक्ता पुणतांबेकर

पुणे, दि. १२ – -संपूर्ण शहराच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस कार्यकरत असणारे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी व्यसनांच्या विळख्यात अडकत असतील तर त्यांना व्यसमुक्तीच्या मार्गावर आणणे, ही आपल्या सगळ्यांची सामाजिक जबाबदारी आहे, असे मत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले.

पुणे महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या सहकार्याने महानगर पालिकेच्या सफाई कर्मचा-यांसाठी आयोजित व्यसनुमक्ती आणि मनःस्वास्थ्य शिबीराच्या उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी पुणतांबेकर बोलत होत्या. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, पुणे महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे, अतिरीक्त आयुक्त रूबल अग्रवाल, उपायुक्त अजित देशमुख, माधव जगताप, प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ.आशिष भारती, डॉ. अंजली साबणे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या की, पुणे महानगर पालिकेने सुरू केलेला मानसिक स्वास्थ्य आणि व्यसनमुक्ती हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधिनतेमुळे व्यसनाधीन व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर अतिशय भयावह दुष्परिणाम होतात.

यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सहस्त्रबुद्धे यांनी अतिशय गरजेच्या विषयाला हात घातला असून त्याचा महानगर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचा-यांची कार्यक्षमात वाढण्यास मदत होईल. सध्या चालू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगानेही या कार्यक्रमाचे अधिक महत्त्व आहे. सहस्त्रबुद्धे यांनी या शिबीरांची व्याप्ती वाढवावी, त्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन देखील महापौरांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना माधुरी सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, व्यसनांमुळे केवळ ती व्यक्तीच नाही तर त्या व्यक्तीचे कुटुंब, तो परिसर आणि समाज या सगळ्यांचे स्वास्थ्य बिघडते. म्हणून व्यसनमुक्ती हा विषय महत्त्वाचा आहे. महानगर पालिका कर्मच-यांना व्यसनमुक्ती शिबीरात दाखल होण्यासाठी पगारी रजा देणे आणि त्या खर्चाच भार महानगर पालिकेने उचलणे अशी महत्त्वाची तरतूद महिला व बालकल्याण समितीच्यावतीने करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात एकूण 6 कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून महानगर पालिकेचे कर्मचारी व्यसनमुक्त होणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पहिल्या कार्यशाळेत तीन क्षेत्रिय कार्यालयातील सुमारे शंभर सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश परदेशी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading