फडणवीस, राणे, राज ठाकरेंसह बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात
मुंबई, दि. १० – महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील झेड सिक्युरीटी काढण्यात आली असून आता राज ठाकरे यांना वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येईल. मात्र Adv. उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुरक्षाविषयक बैठक झाली होती. त्या बैठकीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणार सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला. या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, राज ठाकरे, नारायण राणे, रावसाहेब दानवे यांच्यासह काही विद्यमान मंत्र्यांच्या समावेश असल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढली जाणार आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी दिला होता. यामध्ये फडवीसांच्या जीवाला अनेक बाजूंनी धोका असल्याचे सांगितले होते. तसेच फडणवीसांची सुरक्षा कमी न करण्याची शिफारस केली होती. मुंबई पोलिसांसह गुप्तचर यंत्रणेने हा अहवाल दिला होता, असे माहित असूनही फडणवीसांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तसेच कृपाशंकरसिंह यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. शिवाय संजय बनसोडे, अस्लम शेख यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
