Saturday, May 30, 2026
PUNETOP NEWS

कोरोना योद्ध्यांच्या सहकार्यामुळे लढा सुकर – मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन

पुणे : “कोरोनाच्या आकस्मिक संकटामुळे महापालिकेच्या यंत्रणेवर ताण आला. मात्र, विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी कोरोना योद्धा बनून या लढ्यात साथ दिली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे कोरोनाचा लढा सुकर झाला आणि आपण त्यावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी ठरलो. कोरोनामुळे कामाची व्याप्ती, कार्यक्षमता वाढली. संकटकाळातील व्यवस्थापनाचा अनुभव समृद्ध झाला,” असे प्रतिपादन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांना कोरोना काळातील अलौकिक कामगिरीसाठी ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी उद्योजक सीए राज देशमुख, लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल सीए अभय शास्री, माधुरी शास्त्री, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके, युवागायक चैतन्य देवढे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कासार आंबोली कोविड सेंटर येथील वैशाली जाधव, अनिता गवई, सोनी भटकुळे, पूजा खरे, प्रसाद तायडे, मारोती सूर्यकार, पल्लवी कलाने या कोरोनायोद्ध्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सामाजिक जाणिवेमधून काम करताना मला समाधान मिळते. कोरोना योद्धयांमुळे आम्ही चांगले काम करू शकलो. पालिकेच्या कर्मचाऱ्यांतील क्षमता, कौशल्य अफाट असल्याचे दर्शन झाले. सूर्यदत्ता संस्थेने नेहमीच विद्यादानासोबतच शहराच्या जडणघडणीतही सक्रिय सहभाग घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यातील त्यांचा पुढाकार कौतुकास्पद आहे.”

“डॉ. संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांचे काम आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्यातील सामाजिक दायित्व गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवतो आहे. ज्ञानदानासोबतच सामाजिक कार्यातील त्यांच्या पुढाकारामुळे अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे,” अशा शब्दात मोहोळ यांनी चोरडिया दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक केले.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “गेल्या दहा महिन्यात आलेल्या असंख्य अडचणींचा सामना मोहोळ यांनी केला आहे. या काळात त्यांच्यातील उत्तम नेतृत्व पुणेकरांना अनुभवता आले. कोरोनाशी लढा देताना समाजातील अनेकांनी योगदान दिले आहे. या कोरोना योद्ध्यांना सन्मानित करताना आम्हाला आनंद होतो आहे. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे आज जीवनमान सुरळीत होत आहे.”

सीए अभय शास्त्री म्हणाले, “कोरोनाच्या काळात लायन्स क्लबने अतिशय चांगले काम केले. समाजातील गरजू व वंचित लोकांना आधार देण्याचे काम अनेक संस्थांनी केले. समाजातील संवेदनशीलतेची भावना अजूनही टिकून आहे. आपण अधिकाधिक समाजकार्याला वाहून घ्यावे.” सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading