राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन
पुणे, दि. 4- राज्याचे माजी सहकारमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचे आज अल्पशा आजारानं निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. काही दिवसांपासून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच रुग्णालयात आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर कराड तालुक्यातील उंडाळे या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्रद्धांजली
अभ्यासू आणि मार्गदर्शक नेतृत्व हरपले- उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री)
“राज्याच्या सहकार, ग्रामविकास या क्षेत्रांसह सामान्यांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांतील अभ्यासू आणि मार्गदर्शक नेतृत्व आज हरपले आहे. स्वातंत्र्यसेनानी कुटुंबांचा वारसा जपत विलासकाका यांनी सुरू केलेली राजकीय वाटचाल समाजकारणाशी जोडलेली होती. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळून सहकार, ग्रामविकास, जलसंधारण या क्षेत्रात भरीव काम केले. अनेक संस्था आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी जाणीवपूर्वक बळ दिले. विविध विषयांतील गाढा अभ्यास आणि परखडपणामुळे ते अनेकांसाठी मार्गदर्शक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारण-समाजकारणातील दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे.”
काँग्रेस विचारधारेचा सच्चा पाईक हरपला – अशोक चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री)
“राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारधारेचा सच्चा पाईक हरपला. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसचा विचार उराशी बाळगून लोकसेवा केली. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली तत्त्व आणि मूल्ये कायम ठेवली. ते सर्वसामान्यांशी नाळ जुळलेले एक लोकप्रिय नेते होते. सलग ३५ वर्षे आमदार म्हणून सातारा जिल्ह्यासाठी आणि सहकारमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते निकटचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे”
