Wednesday, June 17, 2026
PUNETOP NEWS

अकल्पित राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचे भाष्य करण्याची साहित्यात ताकद – भारत सासणे

पुणेः- प्रादेशिक साहित्यिकांपासून ते जागतीक स्तरावरील साहित्यिकांपर्यंत सर्वांनीच त्यांच्या त्यांच्या क्षमतांनुसार समाजाच्या वाटचालीचे निरिक्षण करुन समाज आणि राजकीय विचारधारा नक्की कोणत्या दिशेने चालली आहे आणि त्याचे बरे किंवा वाईट परिणाम काय होतील याबाबत भाष्य करुन ठेवल्याचे दिसून येते. यावरुन अकल्पित राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचे भाष्य करण्याची साहित्यात आणि साहित्यीकांत ताकद असते असे म्हटल्यास वावगे होणार नाही, असे मत प्रसिद्ध साहित्यीक आणि समिक्षक तसेच 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजीत 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन आज राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे महापाैर मुरलीधर मोहोळ, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, या महाराष्ट्रातील पहिल्या ऑनलाईन संमेलनाचे समन्वयक आणि साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संचालक देवेन सूर्यवंशी आणि संचालक दिवाकर पोफळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भारत सासणे म्हणाले की, आजच्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराबाबतही थेट किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय साहित्यीकांनी सुतोवाच करुन ठेवल्याचे आढळून येते. आज उद्भभवलेल्या हताश आणि निराशाजनक सामजिक मानसिकतेबाबत साहित्याकांनी भाष्यकार म्हणून भाष्य केलेले आहे.जागतीक साहित्याचा या अनुषंगाने विचार करावयाचा झाल्यास ‘द वुल्फ अॅट द डोअर’ असे आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे वर्णन करुन ठेवलेले आहे. लाडंगा दारा बाहेर येऊन बसला असून समाज एका अनामिक भिती आणि दहशतीखाली वावरतो आहे. समाजमन सध्या भ्रमिष्ट झाले असून समाजाला शोषणमुक्त, भष्ट्राचारमुक्त आणि दहशतमुक्त वातावरण हवे आहे. मसिहा येईल आणि आपणास या परिस्थितीतून सोडवेल अशा भ्रामक समजुतीत हा समाज अडकून पडलेला आहे. साहित्यातून या सर्वसामान्यांचे दुःख मांडणारे साहित्यीक हरवले आहेत. साहित्यातून सर्वसामान्य माणसांचा चेहराच हरवला असून मनोरंजनात्मक साहित्याचा भडीमार होत आहे. साहित्यात हा सर्वसामान्यांचा चेहरा पुन्हा प्रस्थापीत करणे ही साहित्यीकांची जबाबादारी आहे. भ्रमयुगात झालेल्या प्रवेशापासून आपण आपली सुटका करुन घेत वास्तववादी समाजरचनेकडे वाटचाल केली पाहिजे. रस्त्यावर , गल्लीत आणि दिल्लीत साचून राहिलेल्या दहशतीच्या मळभाबाबत प्रतिकात्मक संवाद दबक्या आवाजात एेकू येत आहेत. दहशत, भिती, आतंक यांनी जीवनात प्रवेश केला असून उपाहासात्मकरित्या ते साहित्यात मांडले जात असले तरी सगळीकडे चतूर माैन बाळगले जात आहे. अभिव्याक्तीचा संकोच केला जात आहे. निरर्थक भांडणांत गुंतवून ठेऊन समाजा-समाजात विभागणी केरण्याचे कटकारस्थान आखले जात आहे. आपणच विभाजीत होऊन नष्ट व्हायचे आहे का, हे ठरविण्याची वेळ आली आहे.

यावेळी बोलताना आमदार चेतन तुपे म्हणाले, मराठी भाषेला केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा का देत नाही हे न उलगडणारे कोडे आहे. आज 13 कोटी जनता म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 12 टक्के जनता मराठी बोलते तरी देखील केंद्र सरकार आडमुठेपणाची भूमिका घेते. समितीचा अध्यक्ष म्हणून मी या विषयाचा विविध स्तरावार पाठपुरावा करीतच आहे.

यावेळी रामचंद्र देखणे यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनी केले. सूत्रसंतालन साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे यांनी केले. महाराष्ट्रातील पहिल्या ऑनलाईन संमेलनाचे समन्वयक आणि साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संचालक देवेन सूर्यवंशी यांनी आभार मानले.

यंदा या संमेलनाचे 20 वे वर्ष आहे. मात्र कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळ्यानंतरचे आजचे उर्वरित कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात आले. ‘साहित्य-कला आणि जातीचे राजकारण’ या विषयावरील परिसंवादात राजन खान आणि डाॅ. गणेश मोहिते सहभागी झाले होते. त्यानंतर प्रा. अाप्पासाहेब खोत आणि डाॅ. प्रतिभा जाधव यांचे कथाकथन झाले. तर ‘संमेलनाध्यक्षांशी गप्पा’ या कार्यक्रमात 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी डाॅ. वर्षा तोडमल यांनी संवाद साधला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading