राज्यात थंडीचा कडाका वाढणार
पुणे – गेल्या आठवड्यात ऐन थंडीतही अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई ठाण्यासह उपनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर तपामानात घट झाली होती. या आठवड्यात राज्यातील काही शहरांमध्ये गारवा जाणवत होता. राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण ढगाळ वातावरणामुळे राज्यात फारशी थंडी जाणावत नव्हती. मात्र आता उत्तर भारतातून थंडीचा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कोरडं हवामान असल्याने पुढचे पाच दिवस हवामान असंच राहणार असून तापमानात आणखी घट होईल. तर या आठवड्यातही बऱ्यापैकी थंडी होती. पण आता पुढच्या आठवड्यात थंडीचा तडाखा वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यासह उत्तरेकडील राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा आणि चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये गारठा वाढेल आणि आठवड्याअखेरीस तापमानात पुन्हा वाढ होईल. हवामान खात्याने सांगितले की, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशात पुढील दोन दिवस थंडी असेल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, आता उत्तरेकडून राज्यात थंड वाऱ्याचा प्रवाह वाहू लागला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत चांगलाच गारठा वाढल्याचं पाहायला मिळतंय. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ लागली आहे. या कोरड्या वातावरणामुळे नववर्षाच्या सुरुवातीला राज्यात चांगलाच गारठा वाढणार आहे.
