Tuesday, June 16, 2026
NATIONALTOP NEWS

सोनिया गांधींच्या जागी शरद पवारांना मिळणार UPAचं अध्यक्षपद?

नवी दिल्ली, दि. १० – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने नवी समीकरणे उदयास येणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. कृषी कायद्यांसंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सीताराम येचुरी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटायला गेले होते. त्यानंतर केंद्रात शरद पवार भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची मोट बांधणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. येत्या काळात शरद पवार UPA चे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. पंजाब, हरयाणासह देशभरातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. असे असताना देशातील विरोधी पक्ष अद्याप एकत्र आलेले नाही आहेत. तर दुसरीकडे पंजाब मधील अकाली दल देशातील विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अकाली दलातील नेत्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. असे असले तरी विरोधी पक्ष एकत्र येऊन मोठा आवाज उठवलेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात २०१४ नंतर कोणी एवढा आवाज उठवला नव्हता, जेवढा शतकऱ्यांनी आता उठवला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले आहे पण देशातील विरोधी पक्ष मात्र अजूनही चाचपडत आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण इथून विरोधी पक्षाची सुरुवात होते. तर प्रादेशिक पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार हा प्रश्न उनुत्तरित आहे. दरम्यान, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात शरद पवार मदतगार ठरतील का? शरद पवार यांचे सर्वच पक्षाशी चांगले संबंध आहेत. शरद पवार यांनी यूपीए सरकार सत्तेत असताना १० वर्ष कृषी मंत्री म्हणून काम केले आहे. शेतकऱ्यांच्या विषयावर शरद पवार यांच्या इतका अनुभवी नेता कोणत्याही पक्षात नाही. त्यामुळे काँग्रेस आणि सर्व प्रादेशिक पक्षांना शरद पवार एकत्र आणू शकतील का? त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विषयावर सगळे एकत्र येतील का हे येणारा काळ ठरवेल.

देशाचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता पवारांकडे – राऊत

देशाचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणाकडे असेल तर ती क्षमता शरद पवार यांच्याकडे आहे. लोकांच्या प्रश्नांची, देशाची जाण आणि खंबीरपणा शरद पवार यांच्याकडे आहे. मात्र, भविष्यात राजकारणात काय होईल हे आता सांगू शकत नाही. महाराष्ट्रात जो प्रयोग झाला तो देशात व्हावा अशी भावना विरोधकांची आहे. तसेच महाराष्ट्रात पवारांनी नेतृत्व केले, तसेच देशपातळीवर नेतृत्व करावे असे विरोधकांना वाटत आहे, असे शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना अजून यूपीएमध्ये गेलेली नाही, त्यामुळे यूपीएबद्दल भूमिका मांडू शकत नाही,
असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading