कोविड काळात कीर्तन हे समुपदेशनाचे साधन- प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी यांचे मत
पुणे : शाळा किंवा विद्यापीठात आम्ही जे शिकवितो, त्याला ज्ञानदान म्हणतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना पदवीही देतो. मात्र, कीर्तन हे भक्तीभाव व प्रबोधन करण्याचे पवित्र आणि समृद्ध माध्यम आहे. मानसशास्त्राला जे जमले नाही, ते कीर्तन परंपरेने करुन दाखविले. कोविड काळात कीर्तन हे समुपदेशनाचे महत्वाचे साधन म्हणून उपयुक्त ठरले, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सव २०२० चे आयोजन सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथून आॅनलाईन पद्धतीने करण्यात आले. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.मोरेश्वरबुवा जोशी च-होलीकर यांना कीर्तन कोविद ह.भ.प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ह.भ.प.मंगलमूर्ती औरंगाबादकर, शाहीर हेमंतराजे मावळे, शिरीष मोहिते, प्रा.संगिता मावळे आदी उपस्थित होते. रुपये ५ हजार, पुणेरी पगडी, स्मृतीचिन्ह व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप होते.
डॉ.एन.एस.उमराणी म्हणाले, आपल्याला जे माहित आहे, ते चांगले ज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून करीत आहेत. कीर्तनाची परंपरा तरुणाईपर्यंत पोहोचायला हवी. समाजाला ताकद देण्याची क्षमता कीर्तनासारख्या कलांमध्ये आहे. प्रबोधन, शिक्षण आणि समुपदेशनाकरीता कीर्तन परंपरा गरजेची आहे.
ह.भ.प.मोरेश्वरबुवा जोशी च-होलीकर म्हणाले, कीर्तन क्षेत्रात कितीही काम केले, तरी कमी आहे. समाजाला कीर्तनातून प्रबोधनाची गरज आहे. समाजाने ख-या अर्थाने वंदन केलेली कीर्तनाची गादी आहे, ती आपण जपायला आणि वाढवायला हवी.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, नारदीय कीर्तन वैभवापर्यंत नेणे, हा आमचा उद्देश आहे. आज अनेक कलांना व्यासपीठ उपलब्ध नाही. त्यामुळे कीर्तनाला व्यासपीठ देण्यास कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कीर्तन महोत्सवात संत शिरोमणी नामदेव महाराज सार्ध सप्तशती जयंती वर्ष समारोपाच्या निमित्ताने यंदा राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांनी संत नामदेव विजय यात्रा आपल्या कीर्तनातून सांगितली. होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले.
