पीआयसीच्या वतीने ८ व्या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’चे आयोजन

पुणे, दि. २ –  देशभरातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील नावीन्यपूर्ण संशोधनांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी)च्या वतीने दरवर्षी नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ (एनसीएसआय)चे आयोजन करण्यात येत असते. याही वर्षी येत्या शुक्रवार दि. ४ डिसेंबर व शनिवार दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते सायं ६.३० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने आठव्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’चे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद सर्वांसाठी विनामूल्य खुली असून त्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.  

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन (एनआयएफ) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यांचे सहकार्य परिषदेला लाभले आहे. शुक्रवार दि. ४ डिसेंबर रोजी पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने, सहयोगी संचालक अभय वैद्य यांच्या उपस्थितीत परिषदेला सुरुवात होईल. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य, अर्बन डेव्हलपमेंटचे संचालक किरण कुलकर्णी, कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचे डॉ. विपिन कुमार, राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी इंस्टीट्यूट फॉर कन्टेम्पररी स्टडीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक विजय महाजन हे देखील या वेळी उपस्थित असतील.        

देशभरातील संशोधक वृत्तीचे आणि सामाजिक बांधिलकीचे एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नवसंशोधकांना प्रोत्साहित करणे हा सदर परिषद भरविण्यामागील उद्देश असून दरवर्षी यासाठी देशभरातून संशोधक सहभागी होत असतात.  

शिक्षण, आरोगी व पर्यावरण यांसारख्या विषयातील देशभरातील १०० हून अधिक संशोधकांनी आपल्या संशोधनासह यावर्षी परिषदेसाठी नोंदणी केली होती. ज्यामधून तज्ज्ञ समितीकडून ८ राज्यातील १८ सामाजिक संशोधकांची (सोशल इनोव्हेटर्सची) निवड करण्यात आली आहे. यामध्ये ११ संशोधक हे महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. आदिवासी, ग्रामीण व शहरी अशा तीन प्रकारात हे १८ संशोधक आपल्या नवसंकल्पांचे सादरीकरण परिषदे दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करतील. यामधून शेवटच्या सत्रात प्रत्येक विभागातील एका संशोधकाची निवड करीत त्याला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. तीन विभागातील तीन संशोधकांना प्रत्येकी रु. ५०, ००० इतके पारितोषिक देण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: