Monday, June 15, 2026
PUNE

पुणे कीर्तन महोत्सव यंदा आॅनलाईन

पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. कीर्तन महोत्सवात संत शिरोमणी नामदेव महाराज सार्ध सप्तशती जयंती वर्ष समारोपाच्या निमित्ताने यंदा राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे हे संत नामदेव विजय यात्रा आपल्या कीर्तनातून सांगणार आहेत, अशी माहिती शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली. 
प.पू.जगद््गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशिर्वादाने आणि गुरुवर्य ह.भ.प.डॉ.किसन महाराज साखरे गौरवार्थ कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) विभागप्रमुख डॉ.प्रविण भोळे यांच्या हस्ते होणार आहे. 
महोत्सवाच्या समारोपप्रसंगी शनिवार, दिनांक ५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.मोरेश्वरबुवा जोशी च-होलीकर यांना कीर्तन कोविद ह.भ.प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रुपये ५ हजार, पुणेरी पगडी, स्मृतीचिन्ह व उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.एन.एस.उमराणी उपस्थित राहणार आहेत. 
प्रबोधिनीच्या शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी या फेसबुक पेजवरुन हा महोत्सव रसिकांना विनामूल्य पहायला मिळणार आहे. पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने आॅनलाईन पद्धतीने कीर्तनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading