Sunday, May 31, 2026
MAHARASHTRATOP NEWS

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश, रश्मी ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन


मुंबई, दि. 1 – अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत ऊर्मिला यांनी सेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधनाचा धागा बांधून ऊर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे मोजक्याच नेत्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. तसंच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा मातोश्रीवर येण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेची महिला आघाडीच्या उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मातोश्रीवर हजर होत्या.

विशेष म्हणजे, शिवसेनेनं या आधीच ऊर्मिला मातोंडकर यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत समावेश केले आहे. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच त्या विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणार आहेत. त्यापूर्वी त्यांना शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करावा लागणार होता, त्याची औपचारिकता अखेर आज पार पडली आहे.

दरम्यान, ऊर्मिला मातोंडकर यांच्यावर शिवसेनेनं कोणती जबाबदारी सोपवली आहे, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. आज संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास जुहू इथं ऊर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून आपल्याला कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, काय आपली भूमिका असणार आहे, याबद्दलचा खुलासा मातोंडकर करण्याची शक्यता आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली. मात्र, निवडणुकीच्या मैदानात त्यांना अपयश आलं. तसंच या निवडणुकीनंतर पक्षात मतभेद झाले आणि त्यामुळे मातोंडकर यांनी काँग्रेसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने सुशांतच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर उर्मिला आक्रमकपणे माध्यमांसमोर आली आणि तिने कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading