fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर, दि.१६ : शहीद जवान ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांच्या पार्थिवावर आज बहिरेवाडी येथे पोलिसाच्या चार जवानांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत ३ फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांचे पार्थिव आज सकाळी 7 वा. बहिरेवाडी येथील निवासस्थानी आली. या ठिकाणी काही काळ अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. वडील रामचंद्र जोंधळे, आई कविता, बहीण कल्याणी आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. यानंतर या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौकाचौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी – विद्यार्थिनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते. “अमर रहे अमर रहे ऋषीकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम” अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा श्री भैरवनाथ हायस्कूल येथे पोहचली. ही अंत्ययात्रा अंतिम संस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

सुभेदार सखाराम पवार, माजी आमदार संजय घाटगे, समरजितसिंह घाडगे, जि. प. उमेश आपटे, सरपंच अनिल चव्हाण, उपसरपंच उमेश खोत, कर्नल कुलदिप कुमार कर्नल आर. आर. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले, कर्नल शिवाजी बाबर आणि आजी माजी सैनिक संघटच्यावतीनेही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.

खासदार श्री. मंडलीक आपल्या शोकसंदेशात म्हणाले, ऊन, वारा, वादळ, कोरोना अशा संकटावर मात करत चीन- पाकिस्तान सारख्या शत्रुपासून देशाचे संरक्षण आपले जवान करत आहे. म्हणून आपण सुरक्षित आहोत. शहीद जवान ऋषीकेश यांच्या सारखा जवान आपल्या मातीत जन्माला आला त्या मातीला मी सलाम करतो आणि श्रद्धांजली वाहतो.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, देशासाठी प्राणपणे लढत सर्वस्वपणाला लावणारा तरुणांचा अभिमान आज आपल्यात नाही. भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद जवान ऋषीकेश यांनी दिलेले बलिदान देश कधिच विसरु शकणार नाही. जोंधळे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जोंधळे कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहू. शहीद जवान ऋषीकेश यांनी दिलेले बलिदान वाया जाणार नाही.

पोलीस आणि लष्कराच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद जवान ऋषीकेश यांचे चुलत बंधू पुंडलिक यांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अधिकारी, पदाधिकारी त्याचबरोबर लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading