राज्यात शनिवारी ४ हजार २३७ नवे करोनाबाधित, २ हजार ७०७ जण करोनामुक्त

मुंबई, दि. १४ – राज्यात आज दिवसभरात  ४ हजार २३७ नवे करोनाबाधित आढळले. तर, २ हजार ७०७ जण करोनामुक्त झाले. शिवाय, १०५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४१ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १६ लाख १२ हजार ३१४ जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ८५ हजार ५०३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ४५ हजार ९१४ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.

दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाली तरी करोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बाधित रुग्णांच्या प्रमाणानुसार जिल्ह्य़ातील रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्य़ांना दिल्या आहेत. तसेच करोना आणि बिगरकरोना उपचारांचा मेळ साधण्यासाठी आधुनिक सुविधांसह उपचार विशेष (सुपर स्पेशालिटी) रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही, असे आदेशही सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत. यामुळे अन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

करोना साथीच्या काळात सरसकट सर्वच आरोग्य व्यवस्था करोना केंद्री झाल्याने इतर आजारांच्या सेवा काही प्रमाणात खंडित झाल्या होत्या. आधुनिक उपचार देणारी सुपरस्पेशालिटी रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून कार्यरत असल्याने तातडीच्या नसलेल्या अनेक शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत. संसर्गाची तीव्रता गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याने आता इतर आजारांच्या सुविधाही उपलब्ध करण्याच्या उद्देशातून रुग्णोपचार व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: