अर्णब गोस्वामीला सुप्रीम कोर्टाने दिला जामीन
नवी दिल्ली, दि. 11 – आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जस्टिस चंद्रचूड़ यांच्या बेंचने अर्णब आणि इतर दोघांना 50 हजार रुपयांच्या बॉण्डवर अंतरिम जामी मंजूर केला. तसेच, कोर्टाने पोलिस आयुक्तांना जामीन आदेश तत्काळ कार्यान्वित करण्यास सांगितले.
यासोबतच, कोर्टाने राज्य सरकारला फटकारले की, जर राज्य सरकारांनी एखाद्या व्यक्तीला लक्ष्य केले तर त्यांना असे वाटले पाहिले की, आम्ही (सर्वोच्च न्यायालय) त्यांचे रक्षण करू.
दरम्यान, ‘अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यामुळे अन्वय नाईक यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली असावी,’ असा युक्तिवाद गोस्वामी यांचे वकील हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या वतीने युक्तिवाद करताना हरिश साळवे म्हणाले की, ‘अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यामुळे, त्यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली, अशीही शंका आहे,’ असे हरीश साळवे म्हणाले.
युक्तिवादादरम्यान अर्णब आणि अन्वय नाईक यांचा थेट काहीही संबंध नव्हता, असे साळवे यांनी म्हटले आहे. ‘मागच्या महिन्यात महाराष्ट्रामधील एका व्यक्तीने आत्महत्या केली. यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांमुळे आपल्याला वेळेत पगार मिळाला नाही असे म्हटले होते. मग तुम्ही काय मुख्यमंत्र्यांना अटक करणार?,’ असा प्रश्न साळवे यांनी उपस्थित केला. यासोबतच, साळवे यांनी अर्णब आणि अन्वय यांच्यामध्ये कोणतेही खासगी संबंध नसल्याचेही सांगितले आहे. एखाद्या कराराच्या आधारावर आत्महत्येला प्रोत्साहन दिले असे म्हणता येणार नाही, असा युक्तीवादही त्यांनी यावेळी केला.
