‘आचार्य उद्धव ठाकरे मंदिरे कधी सुरू करणार?’ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

अकोला – राज्यातील अनेक सोयी सुविधा, उद्योगधंदे सुरू होत आहेत. मात्र, मंदिरे अद्यापही टाळेबंदीत आहेत. त्यामुळे यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यसरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “आचार्य उद्धव ठाकरे, आचार्य अजित पवार आणि आचार्य बाळासाहेब थोरात मंदिरं कधी सुरु करणार आहात? आचार्य आणि हभप यांचं वाकडं आहे का?” हभप यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं म्हणून यांना राग आला आहे का? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारले आहेत. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची, कोरोनाबाबत तात्पुरती रुग्णालये उभी करण्याची ताकद मंदिर संस्थांमध्ये आहे, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.

राज्यातील सर्व मोठ्या मंदिरांनी सरकारला एक ऑफर दिली होती, अशी माहितीही आंबेडकरांनी दिली आहे. ‘भाविकांसाठी मंदिरं सुरु करा, आम्ही चाचणी करतो. कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मंदिरांची असेल. सरकार सांगेल तिथे कोविड सेंटर उभे करण्याची तयारी मंदिरांनी दाखवली होती, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरला विठ्ठल-रुख्मिणी मंदिरावर वारकरी मोर्चा काढण्यात आला होता. राज्यातील सर्व मंदिरं सुरु करा अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. पण राज्य सरकारने अद्याप मंदिरं सुरु करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यावरुन आंबेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांना खोचक प्रश्न विचारले आहेत.
मंदिरं, प्रार्थनास्थळांबाबत दिवाळीनंतर नियमावली
राज्यातील धार्मिकस्थळं दिवाळीनंतर उघडणार असल्याचे संकेतमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मंदिरं उघडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर गंडांतर येऊ नये म्हणून सावध पावलं टाकत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

%d bloggers like this: