दिव्यांग मुलांच्या संस्थेला ‘सूर्यदत्ता’तर्फे महिन्याचे धान्य

पुणे : सूर्यदत्ता फूड बँकेच्या वतीने पिरंगुट येथील ओम साई ओम या दिव्यांग मुलांच्या संस्थेला एक महिन्याचे धान्य, जीवनावश्यक व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही सन्मानित करण्यात आले. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत ही फूड बँक सुरु करण्यात आलेली आहे. ‘सोशल अफलिफ्टमेंट’ उपक्रमांतर्गत सूर्यदत्ता शिक्षण संस्था आणि लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यदत्ता संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये नुकताच हा उपक्रम पार पडला.

सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. अक्षित कुशल, प्रा. सुनील धाडीवाल, सिद्धांत चोरडिया, लायन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी देशमुख, सेवाकार्य प्रमुख सीमा दाबके, दिपाली ठाकर आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक रोहित देवते यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांना ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ हे पुस्तक, उपरणे देऊन सन्मानित करण्यात आले. दर महिन्याला समाजातील गरजू लोकांना अशा स्वरूपात अन्नधान्य देण्यात येत आहे.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजुंना मदत व्हावी, या उद्देशाने ‘सूर्यदत्ता’ने फुड बँक, क्लोदिंग बँक, प्रॉडक्ट्स बँक, नॉलेज बँक आणि बिझनेस बँक अशा पाच उपक्रमांची सुरुवात केली आहे. यामार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जात असून, समाजातील गरजू, होतकरू, आर्थिक मागास वर्गातील लोकांना, शेतकर्‍यांना, सैन्यदलातील सदस्यांना, नोकरदारांना, दिव्यांग मुलांना मदत दिली जात आहे. सुर्यदत्ता फुड बँकेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्था, रोजंदारीवरील मजूर, रस्त्यावर राहणारे नागरिक यांच्यासह गरजूंना अन्न व इतर जीवनावश्यक साहित्य पुरवले जात आहे. क्लोदिंग बँकेमार्फत वापरायोग्य कपड्यांचे संकलन, तसेच नवीन कपडे गरजूना पुरविण्यात येत आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: