संत साहित्य हे जीवनाचे मार्गदर्शक – राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे

पुणेः- काही अंशी काल्पनिकता सोडली तर साहित्यात जीवनाचे अनुभवच रेखाटलेले असतात. संत साहित्यात तर जीवनाचे सारच सांगितलेले असल्याने संत साहित्य हे जीवनात
वर्षांनुवर्षे दीपस्तंभासारखे मागदर्शनच करीत अाहेत, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे य़ांनी व्यक्त केले.

प्रख्यात ज्ञानेश्वरी अभ्यासिका आणि लेखिका डाॅ.ज्योती रहाळकर यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या समश्लोकींचे, ‘ज्ञानज्योती…ओवी पुन्हा नव्यानी’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डाॅ. जयेश राहळकर आणि लेखिका डाॅ. ज्योती रहाळकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना चारुदत्त आफळे म्हणाले की, संत साहित्यात प्रचंड ताकद असते. एकदा तुम्ही त्याच्या सान्निध्यात आलात की, आपोआप तुमच्यातील आणि त्या साहित्यातील व्दैत संपून अव्दैत होते. तुम्ही त्या साहित्याशी तादात्म्य पावतात. ते तुमच्या मन आणि बुद्धीला चांगल्या अर्थाने व्यसन लावते. नवीन पिढीला ज्ञानेश्र्वरी सारख्या महान ग्रंथाच्या सान्निध्यात आणण्याच्या दृष्टीने डाॅ. ज्योती रहाळकर यांचा प्रयत्न सुत्तत्यच आहे. असे प्रयत्न सातत्याने होणे आवश्यकच आहेत.
संतांची भूमिका आई सारखी असते. ‘दृष्टांचे जावो दृष्टपण’ असे संत म्हणतात. दृष्टाच्या समुळ नाशा पेक्षा जो दृष्ट आहे त्याच्यातील दृष्टपण जावो, ही इच्छा ते बाळगातात. तम-रज गुणांमुळे काही वेळा त्या सज्जनत्तेवर झाकोळ येत असेल, पंरतू प्रत्येकाच्या मनातील सज्जनतेवर संतांचा प्रचंड विश्वास आहे. हे झाकोळलेपण दूर होऊन सज्जनत्ता वृद्धिंगत व्हावी या दृष्टीने संतांनी सातत्याने प्रयत्न केले. आज व्यक्तिमत्तव विकास, व्यवसाय कसे करावे, त्यात प्रगती कशी साध्य करावे, व्यवस्थापन कसे असावे यासाठी आपण पाश्चात्य देशांकडे ओंजळी करुन आशेने उभे राहतो. उलट संत साहित्यात क्रित्येक वर्षांपूर्वीच या सर्व प्रश्नांची उत्तर देऊन ठेवली आहेत. या संत साहित्याला केवळ धर्मग्रंथांचे स्वरुप दिल्याने पिढ्यां-पिढ्यांमधील हा संवाद सेतू खंडीत झाला. संत साहित्य हे समजून घ्यायला अवघडच आहे, ते आपणास समजणारच नाही किंवा अापण ते समजावून सांगूच शकणार नाही अशा सीमा आपण आपल्या मनाला घालून घेतल्या आहेत. आज या सीमांचे ख-या अर्थाने सीमोल्लंघन झाले. आपल्याला धक्का बसेल, पंरतू हे सत्य आहे की ज्ञानेश्र्वरी आणि पसायदान माहित नसलेली पिढी आजही सभोवताली आहे. त्या पिढीला या ग्रंथाशी जोडण्यासाठी करण्यात आलेला हा उपक्रम सुत्त्यच आहे.

डाॅ. जयेश रहाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लेखिका डाॅ. ज्योती रहाळकर यांनी लेखकीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या पूवार्धात प्रसिद्ध नृत्यांगना स्मिता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य सादरीकरण झाले. तसेच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ओवी गायनाचा कार्यक्रम झाला. त्यात प्रसिद्ध गायक जितेंद्र अभ्यंकर, प्रसिद्ध गायिका आणि सिने-नाट्य कलाकार रमा कुलकर्णी यांनी गायन केले. डाॅ.ज्योती रहाळकर यांनी या ओवी गायनाच्या कार्यक्रमाचे निरुपण केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर अंजली महागांवकर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: