बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्या प्रदेश अध्यक्षपदी प्रथमेश आबनावे

पुणे: बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी प्रथमेश विकास आबनावे यांची नियुक्ती झाली आहे. अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एन. एस. खोबा यांनी नुकतीच त्यांच्या नावाची घोषणा केली. महाराष्ट्रात अकादमीच्या कार्यविस्ताराची जबाबदारी आबनावे यांच्यावर असणार आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, समन्वय, व्यवस्थापन, समुपदेशन आदीचा अनुभव लक्षात घेऊन ही नियुक्ती केली आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या प्रथमेश आबनावे यांनी इंग्लंड येथील कॉव्हेंट्री युनिवर्सिटीमधून स्थापत्य अभियांत्रिकी आणि प्रकल्प व्यवस्थापनाची पदवी प्राप्त केली आहे. शाळा व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविकेचे शिक्षण घेतल्यानंतर आबनावे विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित आहेत. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विकास समितीचे अध्यक्ष, बोधी एज्युगुरु संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहेत.
टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालयात असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्र प्रमुख पदाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासह प्रथमेश एज्युकेशनल ऍण्ड कल्चरल ट्रस्टच्या सहसचिव, आबनावे इंटिरियरचे संस्थापक संचालक म्हणून काम पाहत आहेत. विविध निवडणूक व्यवस्थापन, सांख्यिकी व्यवस्थापनात ते भाग घेतात. विद्यार्थी व पालकांसाठी करिअर निवड, शैक्षणिक जागरुकता, व्यसनमुक्ती निरनिराळ्या विषयांवर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करतात.
प्रथमेश आबनावे म्हणाले, “राष्ट्रीय स्तरावरील संस्थेत काम करणे ही एक पर्वणी आहे. बाबू जगजीवन राम यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासह संस्कृती आणि साहित्य क्षेत्रासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्यभरात अकादमीच्या कार्यविस्तारासाठी प्रयत्न करणार असून, लवकरच राज्य कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारणी संयोजित केली जाणार आहे. इच्छूकांनी संपर्क साधावा.”

Leave a Reply

%d bloggers like this: