जंबो कोविड सेंटरमधील रुग्णांना श्री महालक्ष्मी देवीचा फळांचा प्रसाद

पुणे : श्री महालक्ष्मी मातेसमोर नवरात्र उत्सवात नऊ दिवस दररोज सुमारे २५०० ते ५००० फळांचा नैवेद्य दाखविण्याचा संकल्प श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने केला आहे. दररोज देवीला दाखविण्यात येणा-या या फळांचा नैवेद्य पुण्यातील कोविड सेंटर्समधील रुग्ण, कर्मचारी व डॉक्टरांना देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटर व सारसबाग येथील सणस मैदानावरील कोविड सेंटरमध्ये फळे देऊन प्रारंभ झाला. 
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटरमध्ये पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे, सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश माने यांच्या हस्ते फळे देण्यात आली. यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, नगरसेवक प्रविण चोरबोले, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. जंबो कोविड सेंटर शिवाजीनगर, सारसबाग येथील सणस मैदानावरील कोविड सेंटर, कोंढवा कोविड सेंटर, गंगाधाम येथील कोविड सेंटर, ससून हॉस्पिटल कोविड सेंटर आदी ठिकाणी फळे पाठविण्यात आली आहेत. ॠषिकेश मोरे, कुणाल काची, राजू चमेडिया यांनी या उपक्रमाला सहाय्य केले आहे. 
रुबल अग्रवाल म्हणाल्या, श्री महालक्ष्मी देवीला दररोज वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखविण्यात येत असून हा फळांचा प्रसाद पुण्यातील विविध कोविड सेंटर्सना पाठविण्यात येत आहे, हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कोविड सेंटर्समधील रुग्ण, कर्मचारी व डॉक्टरांकरीता ही फळे देण्यात येत असल्याने त्यांना वेगळी उर्जा मिळले. यामाध्यमातून संपूर्ण उत्सवात सुमारे २० हजार फळे कोविड सेंटर्समधील रुग्ण व कर्मचा-यांना देण्यात येणार असून ट्रस्टने कोविडच्या काळात देखील वेगळ्या प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली आहे. 
ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, ट्रस्टतर्फे धार्मिक कार्यक्रम सुरु असून विविध सामाजिक उपक्रमांवर देखील भर देण्यात येत आहे. यंदाचा उत्सवाचा खर्च कोरोनाकाळात सेवा दिलेल्या व समाजातील गरजू घटकांसाठी करण्यात येत आहे. तसेच श्री महालक्ष्मी माता, श्री महासरस्वती माता व श्री महाकाली माता यांच्या चरणी कोरोना महामारीचे  संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. मंदिर बंद असून श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org वरुन तसेच फेसबुक पेज  व  युट्यूब तसेच स्थानिक केबलवर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: